पालिकेचा गृह विभागाकडे प्रस्ताव, वंर्दळीच्या ठिकाणांचा समावेश
शहरातील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई पालिकेने शहरातील ११०० मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून आर्थिक सहकार्य मिळणार असून शहरातील वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश यात केला आहे. ज्यामुळे विविध गुन्ह्य़ांचा तपास लावणे पोलिसांना शक्य होणार आहे.
नवी मुंबई पालिकेने काही महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही संदर्भातील ३५० कोटी रुपयांचा एक प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला होता. पण या प्रस्तावात नवी मुंबई पोलिसांनी सुचविलेल्या ठिकाणांचा समावेश नसल्याने हा प्रस्ताव माघारी पाठविण्यात आला होता. शिवाय पालिकेने निश्चित केलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जागांची स्थानिक पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पोलिसांनी सुचविलेल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश या अंतिम प्रस्तावात केला जाणार आहे. त्यानुसार गृह विभागाच्या आदेशानुसार नवी मुंबईतील ११०० ठिकाणांवर हे सीसीटीव्ही लावण्यात येणार असून यात तलाव, जॉगिंग ट्रॅक, आठवडी बाजार, शाळा, बाजारपेठ अशा वर्दळीच्या भागांचा समावेश आहे.
गुन्ह्य़ाची उकल होण्यास साहाय्य
नवी मुंबई पालिकेने यापूर्वी बसविलेल्या २६२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून पोलिसांनी आतापर्यंत छोटय़ा-मोठय़ा दीडशे गुन्ह्य़ांचा तपास केला आहे. यात सोनसाखळी चोरांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना अधिक सोपे झाले आहे. शिवाय सिडकोनेही दक्षिण नवी मुंबई क्षेत्रात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंर्तगत ५७४ तर खारघर क्षेत्रात १२८ सीसीटीव्ही असल्यामुळे अनेक गुन्ह्य़ांची उकल होणे सोपे झाले आहे.
गृह विभागाच्या आदेशाने शहरातील ११०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पोलिसांच्या अभिप्रायानंतर तो पुन्हा गृह विभागाकडे पाठविला जाणार आहे. या प्रस्तावात नवी मुंबईतील सर्व महत्त्वाच्या जागांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होणार आहे.
–अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई