; बंद पडलेले सिग्नलही सुरू करणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघा ते पनवेल दरम्यान २८ नवीन सिग्नल लावण्यात येणार आहेत. सध्या या भागात एकूण ६७ सिग्नल आहेत. नवे २८ सिग्नल लावल्यानंतर आणि शहरात महत्त्वाच्या सहा ठिकाणी बंद असलेली सिग्नल यंत्रणा दुरुस्त केल्यानंतर वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि विविध ठिकाणची कोंडीची समस्या सुटेल, असा विश्वास वाहतूक विभागाने व्यक्त केला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल-शीव महामार्गावरील वाशीपर्यंतचा महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच मार्ग व नेरुळ-उरण-पनवेल महामार्गापर्यंतचे विस्तीर्ण रस्ते येतात. तेथील वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी वाहतूक विभागावर आहे. शहरात दिवसागणिक वाढणारी वाहने, अपघात पाहता वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी  वाहतूक पोलिसांना बरीच कसरत करावी लागते. शहराचा वाढता विस्तार पाहता वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिका व पनवेल विभागात स्थानिक आस्थापनेच्या मदतीने शहराअंतर्गत रस्त्यांवर तसेच महामार्गावर विविध ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. शहरात वाहतूककोंडी होऊ  नये, यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार व वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार काही विभागांत सम-विषम पार्किंग व्यवस्था केली जाते. तसेच काही अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांच्या हरकती सूचना मागवून सिग्नल लावले जातात. सध्या शहरात एकूण ६७ ठिकाणी सिग्नल आहेत. अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणाच वारंवार बंद पडते.

नवी मुंबई पालिका हद्दीत सीवुड्स, एल अँड टी उड्डाण पुलाच्या पूर्व-पश्चिम दिशेला असणारे दोन्ही सिग्नल फक्त नावापुरते आहेत. आम्रमार्गावरील नेरुळ उरण फाटा, तसेच महामार्गावरील अनेक सिग्नल बंद आहेत. खारघपासून पनवेलच्या हद्दीतही अनेक ठिकाणी सिग्नल अनेकदा बंद पडतात. अनेक वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.

वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार शहरात स्थानिक आस्थापनांकडून सिग्नल यंत्रणा बसविली जाते, या स्वयंचलित यंत्रणांच्या देखभालीची जबाबदारी सीएमएस कंपनीकडे आहे. याबाबत वाहतूक विभागाने तात्काळ योग्य ती कारवाई करून सिग्नल यंत्रणेत सुधारणा करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

६७ शहरातील एकूण सिग्नल

२८ प्रस्तावित सिग्नल

१३ नवी मुंबई पालिकेकडून प्रस्तावित

०३ पनवेल महापालिकेकडून प्रस्तावित

०५ एमआयडीसीकडून प्रस्तावित

०७ सिडकोकडून प्रस्तावित

सदोष सिग्नलची ठिकाणे

शीव-पनवेल महामार्गावरील उरण फाटा, नेरुळमधील एल. पी. सर्कल, सानपाडा येथील उड्डाण पुलाखालील सिग्नल, सीवूड्सजवळील पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या दोन्ही चौकांतील सिग्नल असे एकूण सहा सिग्नल वारंवार बंद पडतात. शीव-पनवेल महामार्गवरील टोलवेज प्रा. लि. कंपनी तसेच पीडब्लूडी यांच्या वादात मुख्य रस्त्यावरील सिग्नल बंद आहेत.

नवी मुंबई वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या बंद सिग्नल यंत्रणांचा आढावा घेण्यात आला आहे. तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील, तर काही ठिकाणी नवे सिग्नल उभारले जातील.

– नितीन पवार, उपायुक्त वाहतूक विभाग नवी मुंबई 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 new signals in navi mumbai
First published on: 29-08-2017 at 05:13 IST