व्यवहारातील पैसै दिले नाहीत म्हणून भागीदाराचे अपहरण केल्याचा प्रकार नवी मुंबईतील उलवे येथे उघडकीस आला आहे. निलेश मोकल असे आरोपीचे नाव असून नरेश काळे असे अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेश काळे यांचा आर्थिक देवाण- घेवाण मधून चेंबूर येथील निलेश मोकल यांच्याशी गेल्या काही दिवसापासून वाद होते. या वादातून निलेश आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांनी नरेश यांचे अपहरण केले होते.
हेही वाचा- कंटेनरचा ब्रेक फेल आणि ७ ते ८ रिक्षांचा चुराडा
नवी मुंबईतील उलवा येथे राहणारे नरेश काळे आणि चेंबूर येथील निलेश मोकल हे एकत्र काम करीत होते. कालांतराने त्यांच्यात पैशातून वाद झाले व दोघेही वेगवेगळे झाले. मात्र, नरेशकडे व्यावासायीतील पैसे निलेश यांना देणे लागत होते. मात्र, ते पैसे देत नसल्याने काही दिवसांपूर्वी निलेश आणि त्यांचे साथीदार महेश नलावडे आणि आकाश विटकर हे नरेश यांच्या घरी गेले. आपण पोलीस ठाण्यात प्रकरण मिटवू म्हणून नरेश याला गाडीत बसवले. मात्र, गाडी पोलीस ठाणे ऐवजी थेट पुण्यातील चाकण येथे नेण्यात आली. त्या ठिकाणी तिघांची नजर चुकवून नरेश यांनी पलायन केले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा शुक्रवारी एनआरआय पोलीस ठाणे नवी मुंबई येथे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.