बेलोंडाखार, मोठी जुईमधील शेतीचे नुकसान
समुद्राला आलेल्या मोठय़ा उधाणामुळे शेतीच्या संरक्षणासाठी येथे बांधलेले बांध फुटले असून त्यामुळे बेलोंडाखार व मोठी जुईमधील पंधराशे एकर जमिनीत खारे पाणी घुसले आहे. याचा परिणाम पिकलेल्या भातपिकांवर झाला आहे. कापणी करून शेतात असलेली भाताची कणसे वाहून गेली असून खाऱ्या पाण्यामुळे भविष्यात येथील शेतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. या विभागातील बांधांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी खार जमीन व सिडको यांच्यावर आहे.
शेतकऱ्यांनी समुद्राला आव्हान देत खाडीकिनाऱ्यावर भातपिकांची शेती केली आहे. येथील शेतकरी अपार कष्ट करून ही बेभरवश्याची शेती करीत आहे. समुद्राच्या उधाणापासून या शेतीचे संरक्षण करण्याचे काम तो स्वत:च करीत होता. मात्र, सध्या शासनाच्या माध्यमातून खार जमीन विभाग व सिडको यांच्यावर ही जबाबदारी आहे. शेतजमिनीत भरतीचे पाणी शिरू नये या करिता असलेल्या उघडींना सिडकोने दरवाजे(फ्लॅप) बसवले आहेत. भरतीच्या वेळी शेतीत घुसू पहाणारे पाणी थांबविण्याचे काम या दरवाजांमार्फत केले जाते. मात्र यावेळी हे दरवाजेच निकामी ठरल्याने बेलोंडाखारीमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याचे बेलोंडाखार बचाव समितीचे सचिव रवींद्र कासुकर यांनी सांगितले. तर मोठी जुई परिसरातही उधाणाचे पाणी पिकलेल्या शेतीत शिरल्याने भातपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मोठी जुई येथील शेतकरी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
या संदर्भात सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील कार्यकारी अभियंता पी. एम. शेवतकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.