नवी मुंबई: नवी मुंबई शहरावर गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणाचे दाट सावट पसरले असून, यामुळे नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या संवेदनशील व्यक्तींसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. या प्रदूषणाचे मुख्य कारण मुंबईतील मानखुर्द येथील कचराभूमीमध्ये लागणारी आग आणि वाशी जवळील औद्योगिक वसाहतींमधून बाहेर पडणारा रासायनिक धूर असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील मानखुर्द येथील कचराभूमीत कचऱ्याच्या अपघटन प्रक्रियेतून तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळे अनेकदा आग लागते. वाऱ्याच्या दिशेने या आगीतून निर्माण होणारा धूर वाशी, कोपरखैरणे आणि आसपासच्या परिसरात पसरतो, ज्यामुळे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावते. सध्या शहरातील वातावरणाला हीच परिस्थिती कारणीभूत असावी असा अंदाज नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने वर्तवला आहे. याशिवाय, वाशी जवळील औद्योगिक वसाहतींमधून रसायनयुक्त सांडपाणी आणि धुरावाटे बाहेर पडणारे रासायनिक वायू या प्रदूषणात भर घालत आहेत. त्यामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे आणि खोकल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ही समस्या अतिशय गंभीर असली तरी प्रशासनाकडून मात्र यावर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्याचे आढळून येत नाही. नवी मुंबई महापालिकेने मानखुर्द कचराभूमीच्या समस्येबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून औद्योगिक प्रदूषणाबाबत ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याला हवामानातील ‘धुकं’ असे संबोधले आहे, परंतु हवेतील उग्र दर्प आणि श्वसनाचे त्रास वेगळीच परिस्थिती दर्शवत आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

नवी मुंबईतील वायू प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रिय कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही एमपीसीबीकडून कोणत्याही ठोस उपाययोजना किंवा कारवाया केल्या जात नाहीत. स्थानिक आमदार आणि वन मंत्री गणेश नाईक यांना भेटूनही अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले, पण परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. प्रदूषण मंडळाने फॉगर यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसून येत नाही. एमपीसीबी चा हा निष्काळजीपणा आणि दिरंगाई पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आमच्या माहितीनुसार शहरात दिवसभर धुकं पसरल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. हवामान बदलामुळे हे धुकं पसरत असून ऊन पडल्यावर वातावरण सुधारेल. मानखुर्दच्या कचराभूमीबाबत चौकशी करून लवकरच उपाययोजना करण्यात येतील. – सतीश पडवळ, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून आम्ही नमुने गोळा केले आहेत. याचे परीक्षण करून योग्यती कारवाई केली जाईल. शहरात आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेली विकास कामे, कचराभूमीत जळणारा कचरा यामुळे वाऱ्याच्या दिशेने हे धुरके नवी मुंबईत येत आहे. याबाबत संबंधित महानगरपालिका आणि विभागांशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या फॉगर यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – राजेश पवार, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका