नवी मुंबई : शहरावर गेले काही दिवस दाट ढग आणि अधूनमधून पडणाऱ्या सरींनी वातावरणात बदल घडवून आणला असून, नवी मुंबईच्या हवा गुणवत्ता निर्देशांकात कमालीची सुधारणा झाली आहे. केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ॲपनुसार, नवी मुंबईतील हवा आज अधिक स्वच्छ श्रेणीत नोंदवली गेली आहे. समीरच्या आकडेवारीनुसार, रविवारी, २६ ऑक्टोबर रोजी शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) केवळ ४२ इतका नोंदवला गेला असून तो ‘चांगला’ या श्रेणीत मोडत असल्याने शहरातील नागरिकांना वाढत्या वायुप्रदूषणातून काहीकाळ दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन आठवड्यांत शहरातील हवा गुणवत्ता पातळी (AQI) सरासरी १००-१९० इतकी नोंदली गेली होती. १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान वाशी, तळोजा, नेरुळ आणि कळंबोली या भागांतील हवेतील सूक्ष्म धूलिकण (PM2.5) चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, अनपेक्षित पावसाच्या मालिकेमुळे आणि हवामानातील बदलांमुळे या सर्व भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) पुन्हा सुरक्षित पातळीवर परतला आहे.
रविवारी (२६ ऑक्टोबर) वाशीतील कोपरीपाडा केंद्राचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २९, नेरुळचा ३२, सानपाडाचा ४७, कळंबोलीचा ४१ तर तळोजा परिसराचा ६० इतका नोंदवला गेला आहे. हे सर्व आकडे ‘चांगल्या’ ते ‘मध्यम’ श्रेणीत मोडतात.
हवामान विभागाच्या (IMD) मते, गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांची दिशा बदलली असल्याने राज्यातील काही भागात आर्द्रता वाढली आहे. परिणामी नवी मुंबईसह आसपासच्या भागात ढगाळ हवामान आणि हलक्या सरींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील तापमानातही काहीशी घट झाली असून, कमाल तापमान सुमारे ३१ डिग्री सेल्सिअस ते किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस असून, आर्द्रतेचे प्रमाण ७५ ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या मते, पुढील ४८ तास नवी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम असून, वाऱ्यांचा वेग ताशी ८ ते १५ किमी दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पावसामुळे हवेतील प्रदूषणकण खाली बसतात. या प्रक्रियेला ‘वेट डिपॉझिशन’ म्हणतात. पावसाच्या थेंबांमुळे सूक्ष्म धूळकण (PM10, PM2.5) जमिनीकडे खेचले जातात. त्यासोबत हवेतल्या आर्द्रतेमुळे आणि वाऱ्याच्या गतीमुळे प्रदूषणकणांचे प्रमाण कमी होते. परिणामी हवेतील पारदर्शकता वाढते आणि आरोग्यदायी वातावरण तयार होते.
तज्ञांच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरअखेर व नोव्हेंबरच्या सुरुवातीला हवामान अधिक स्थिर होईल आणि तापमान घटू लागेल. या काळात प्रदूषणकण जमिनीजवळ स्थिर राहतात, त्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) पुन्हा ‘मध्यम’ ते ‘खराब’ श्रेणीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दिवाळी काळात फटाके आणि शहरातील औद्योगिक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या रासायनिक वायूमुळे निर्माण झालेल्या वायुप्रदूषणात सध्या मोठ्या प्रमाणात घट झाल्याने, रविवारी (२६ ऑक्टोबर) शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी नवी मुंबईकरांनी मोकळा श्वास घेतल्याचा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
