नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नवी मुंबईतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांची बंडखोरी कायम ठेवत असताना महायुतीत बेलापूर विधानसभेतील राजकीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बेलापूर मतदारसंघात भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र व माजी आमदार संदीप हे शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक रिंगणात आहेत. संदीप यांचा हा निर्णय भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पटलेला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मंदा म्हात्रे यांच्यामागे संपूर्ण ताकद उभी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस यांनी घेतला असून हे करत असताना गणेश नाईक हे ऐरोलीत अडकून पडतील अशी ‘व्यवस्था’ही या बंडानिमित्ताने उभी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर विजय चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. नवी मुंबईतून शिंदे यांच्या बंडाला साथ देणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये चौगुले यांचा समावेश होता. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि पुढे शिवसेना हा पक्ष येताच त्यांनी नवी मुंबईत पक्षाचे जिल्हाध्यक्षपद चौगुले यांच्याकडे सोपविले. सत्तेच्या सावलीत राहणे चौगुले यांच्यासाठीही सोयीचे असल्याने तेही शिंदे यांना घट्ट धरून राहिले. शिंदे यांच्या मदतीने गेल्या पाच वर्षांत नवी मुंबईत आपले आर्थिक साम्राज्यही बऱ्यापैकी उभे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले असते तर त्यांना चौगुले यांचे बंड थोपविणे सहज शक्य होते. ठाण्यातील काही नेत्यांनी यासंबंधी चौगुले यांच्याशी चर्चाही केली; परंतु आपली उमेदवारी मंदा म्हात्रे यांच्यासाठीही कशी सोयीची ठरेल हे पटवून देण्यात चौगुले यशस्वी ठरल्याचे समजते. तसेच ‘गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केल्यास मी माघार घेईन’, असा निरोपही चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविला होता. मात्र नाईकांनी या आघाडीवर कोणतीही हालचाल केली नसल्याने चौगुले यांच्यावर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित दबाव टाकण्यात आला नाही, असे सांगितले जाते.

आणखी वाचा-उरण विधानसभेची तिरंगी लढत निश्चित, भाजपा, शिवसेना, शेकाप यांच्यात चुरस

चौगुले यांच्या बंडाविषयी मंदा म्हात्रे यांच्याशी मसलत?

मंदा म्हात्रे यांना बेलापूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देताच संदीप नाईक यांनी बंडाचा निर्णय घेतला. बेलापूर मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचे संदीप यांनी चार महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. ‘मला टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका’, असा निरोपही त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांपर्यंत पोहोचविला आहे. ‘जिल्हाध्यक्ष म्हणून माझे काम पाहा. विद्यमान आमदाराच्या कामाशी हवे तर त्याची तुलना करा’, असेही संदीप यांचे म्हणणे होते. त्यानंतरही भाजपने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देताच संदीप यांनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. या घटनाक्रमामुळे भाजप नेते कमालीचे दुखावले असल्याचे समजते. गणेश नाईक यांनी ऐरोलीतून भाजपमधून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. राज्यातील सध्याची राजकीय गणिते लक्षात घेता भाजपने त्यास हरकत घेतली नसली तरी गणेश नाईक ऐरोलीत एक भूमिका घेतात आणि याच मतदारसंघाला जोडून असलेल्या दुसऱ्या मतदारसंघात त्यांचा मुलगा वेगळी भूमिका घेतो, यामुळे भाजपच्या गोटातही अस्वस्थता असल्याचे समजते.

गणेश नाईक यांना ऐरोलीतून निवडणूक अगदीच सोपी झाली तर त्याचा परिणाम बेलापुरातही दिसू शकेल अशी शक्यता शिंदे गटाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली होती. ‘गणेश नाईकांना मोकळे सोडणे योग्य होणार नाही. शिवाय ते आपल्या पदाधिकाऱ्यांशी साधा संवादही साधू इच्छित नाहीत’, असेही मुख्यमंत्र्यांना पटवून दिले गेल्याचे समजते. ऐरोलीमुळे बेलापूरचे गणितही भाजपसाठी कठीण होऊ शकते हे लक्षात येताच मंदा म्हात्रे यांच्याशी सल्लामसलत करूनच पुढील पावले उचलली गेली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या गोटातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-बेलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीत बंड; अनिल कौशिक, राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश

बंड केल्याबद्दल चौगुले यांच्यावर थेट कारवाई करायची की नाही याबद्दल पक्षाच्या गोटात मंगळवारी दुपारपर्यत चर्चा सुरू होती; परंतु भाजप नेत्यांकडून यासाठी फारसा दबाव नाही असेही शिंदे सेनेतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रातील प्रभावी नेते तसेच माजी नगरसेवकांनाही ‘चौगुले यांना मदत करू नका’ असा कोणताही संदेश दिला गेलेला नाही हे विशेष.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदा म्हात्रे यांच्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका

ऐरोली मतदारसंघातील बंडाविषयी आतापर्यंत कोणतीही भूमिका घेत नसलेले शिंदे गटाचे नेते बेलापुरात मात्र मंदा म्हात्रे यांच्यासाठी जोर-बैठका काढण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी बेलापूरच्या मोहिमेवर निघावे आणि तेथील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसांत यासंबंधीच्या बैठकीचे आयोजन करावे, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे समजते.