पनवेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलची राज्यातच नव्हे, तर देशात एक वेगळी ओळख आहे. अनेक विशेषणे लागलेल्या या शहराचा उदय हा एका छोटय़ाशा गावातून झाला. मुंबईपासून २१ किलोमीटरवर वसलेल्या पनवेलला आज दळवळणाच्या सर्व सेवा उपलब्ध असल्या तरी २०० वर्षांपूर्वी केवळ समुद्रमार्गे वाहतूक होत होती. पनवेल ही एक मोठी बाजारपेठ होती. संत तुकाराम महाराज हे व्यापारासाठी या बाजारपेठेत येत होते, तर चिमाजी अप्पा हे काही काळ या शहरात वास्तव्यास होते, असा दाखला आहे. मुगल, पोतुगीज आणि नंतर ब्रिटिशांची बाजारपेठ असलेल्या या पनवेलमधील शेतमालाची गलबताने मुंबईत वाहतूक केली जात होती. दक्षिण बाजूला असलेल्या गाढी नदीच्या काठावर वसलेले हे गाव ‘पन्यवेळ’ नावाने ओळखले जात होते, तर पाच तलावांत असलेल्या पानवेलीवरून या गावचे ‘पनवेल’ पडले आहे अशी आख्यायिका आहे. या गावाला पावनपल्ली असेही म्हटले जात होते. आज पनवेलला महानगराचे स्वरूप आले आहे.

पूर्वेला विस्तीर्ण पर्वतरांगा, पश्चिमेला खाडी, दक्षिणेला १२ महिने वाहणारी गाढी नदी आणि उत्तरेला जुना मुंबई-पुणे महामार्ग अशी भौगोलिक रचना आहे. पनवेलला सुमारे ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. अठरापगड जातींचे गाव म्हणून पनवेलकडे त्या वेळी पाहिले जात होते. त्यामुळे बारा बलुतेदारांचा खरा आदर्श या गावाने घालून दिला आहे. आजूबाजूच्या एक हजार गावांमधून येणारा शेतमाल पनवेल येथे एकत्र करून तो व्यापारी गलबतांनी मुंबईकडे रवाना करीत होते. त्यामुळे गलबत, जहाज, बोटींचा धक्का म्हणून पनवेलला एक वेगळे महत्त्व होते.

एक-दोन हजार लोकसंख्या असणारे हे गाव नंतर या बाजारपेठेमुळे तालुका म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर सप्टेंबर १८५२ मध्ये या नागरी वसाहतीसाठी पंचक्रोशीतील पहिली नगरपरिषद स्थापन करण्यात आली. आप्पासाहेब वर्तक हे या नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते. तलावांचे गाव म्हणूनही या गावाची एक ओळख आहे. चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर परतीच्या प्रवासात सैनिकांच्या उदरभरणासाठी पनवेलवर चढाई करणार होते, पण येथील काही सावकारांनी अप्पांना असे न करण्याची विनंती केली. त्याबदल्यात त्यांना स्वमर्जीने धन देण्यात आले. त्यामुळे अप्पांनी काही काळ या गावात वास्तव केल्याचे सांगितले जाते. या वास्तव काळात त्यांनी आजचा बल्लाळेश्वर तलाव बांधला आहे. याच वेळी गावच्या आजूबाजूला इतर चार मोठे तलाव गावाची शान होते.

राज्यातील बैलगाडय़ांची दुरुस्ती आणि चाक जोडी बनविण्याचे काम येथील मुस्लीम मोहल्ल्यातून केले जात होते. ती परंपरा आज काही जणांनी जपली आहे. समुद्रमार्गे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावातील सुलभ जमीन, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे काबाडकष्ट, वनौषधी आणि प्रदूषणुक्त परिसर यामुळे आयुर्वेदाचा पहिला कारखाना धूतपापेश्वर १८७२ मध्ये सुरू करण्यात आला. त्यामुळे धूतपापेश्वराचे गाव अशीही एक ओळख नंतर पनवेलची निर्माण झाली. याच वेळी एचओसी कारखान्यानेही कात टाकल्याने नोकरीसाठी पनवेलमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे धूतपापेश्वरमध्ये नोकरी आणि राहण्यास बापटांचा वाडा अशी एक प्रथा पडली होती. पनवेल हे वाडय़ांचे शहर म्हणूनही ओळखळे जात होते. त्यात बापटांचा वाडा प्रसिद्ध आहे. ज्याचे अस्तित्व आजही कायम आहे. याचबरोबर गुळव्यांची हवेली प्रसिद्ध होती. गावाची विभागणी आळ्या आणि वाडय़ा मध्ये केलेली आहे. त्यामुळे बापटवाडा, कुंभार आळी, लाइन आळी, अशी नावे आजही पनवेलमध्ये ऐकण्यास मिळतात. दोन-तीन हजारांचे गाव आता चक्क दोन तीन-लाखांच्या घरात गेले आहे. त्यामुळे गावात सांस्कृतिक वारसा मोठा आहे. ज्येष्ठ कलाकार कमलाकर वैशंपायन यांची पनवेल ही जन्मभूमी तर बाळ लखपती, किशोर जोशी हे त्या काळात नाटय़भूमी गाजवून सोडणारे कलाकार.

पंचक्रोशीत या कलाकरांच्या प्रयोगांना मोठी मागणी होती. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी चंद्रशेखर सोमण यांची सूर्याची पिल्ले ही नाटय़संस्था तर श्री शिवाजी युवक नाटय़ मंडळ, किशोर जोशी यांची नाटय़ चळवळ काल-परवापर्यंत कायम राहिली. संगीत परंपरा कायम ठेवण्यासाठी तात्कालीन मुझिक सर्कल आणि विद्यमान कल्चरल असोसिएशन या संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्वात जुना पांजरपोळ आणि मोकाट जनावरांसाठी कोंडवाडय़ाची व्यवस्था ही या पनवेल गावाने केली होती. सणासुदीचा अशी एक निश्चित परंपरा नाही पण बापटांचा गोकुळाष्टमी महोत्सव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी या उत्सवाला २८७ वर्षे पूर्ण झाली. कोणताही धांगडधिंगाणा नसलेल्या या सणाला बहुतांशी पनवेलकर आवर्जून हजेरी लावतात. उंचच उंच थर लावून हंडी फोडण्याचा या ठिकाणी प्रकार होत नाही. संध्याकाळी संपूर्ण गावभर पालखी मिरवणूक आणि नंतर महाप्रसाद ही परंपरा आजही कायम आहे. याव्यतिरिक्त रामनवमी आणि हनुमान जयंती असेही उत्सव या शहररूपी गावात होतात. कल्याण डोंबिवलीनंतर मराठी नववर्षांचा सर्वात मोठा उत्सव हा या पनवेलमध्ये असतो हे विशेष. गावाचे रूपांतर तालुक्यात झाल्याने ब्रिटिश काळात कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. त्यामुळे वर्दळ वाढली. वाहतुकीसाठी टांगे सुरू झाले. घोडय़ांना पाणी पिण्यासाठी तीन जागी पाणपोई सुरू झाल्या.

बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा जणांना डिझेलवर चालणाऱ्या रिक्षा वितरित करण्यात आल्या. टांगे चालवणाऱ्यांनीच त्या विकत घेतल्या. पनवेलची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या रतन टॉकीजमध्ये हा वितरणाचा कार्यक्रम त्या वेळी मोठय़ा धूमधडाक्यात झाला. रिक्षापूर्वी ठाणे ते पनवेल ही सकाळ-संध्याकाळ येणारी एसटी सर्वाचे आकर्षण होती. येथील टपाल याच एसटीने मुंबईत जात असल्याने आजही टपाल नाका अस्तित्वात आहे. सत्तरच्या दशकात सिडकोचे आगमन झाल्यानंतर पनवेलकरांची हजारो एकर जमीन सिडकोने संपादित केली. भाताचे कोठार असलेल्या पनवेलचे तांदूळ आणि पोहे सर्वत्र प्रसिद्ध होते. त्यावरच आजची खांदा कॉलनी, कळंबोली, पनवेल, ही सिडकोची उपनगरे उभी आहेत. त्या बदल्यात सिडकोने दिलेल्या तुटपुंज्या मोबदल्याच्या विरोधात प्रकल्पग्रस्त नेते दि.बा. पाटील यांनी याच पनवेलमधून आंदोलनाची चळवळ सुरू केली. आप्पासाहेबांनी गाढेश्वर येथून पनवेलसाठी आणलेले पिण्याचे पाणी ही पनवेलकरांसाठी सर्वाधिक आनंदाची बाब मानली जात आहे, तर २६ जुलैच्या पावसात पनवेलमधील ४९ नागरिक वाहून गेल्याचे दु:ख आजही कायम आहे. यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या शिक्षिका महाजन बाईदेखील वाहून गेल्या. १९८५ मध्ये झालेली हिंदू-मुस्लीम दंगलीचे काही वण आजही पनवेलकरांच्या मनावर कायम आहेत. जोशी यांनी याच पनवेल मध्ये १९५१ ते १९५५ ही चार वर्षे विठोबा खंड्डपा ऊर्फ व्ही. के. स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचेही पनवेलमधील प्रभू आळीत वास्तव्य होते. व्ही. के. हायस्कूल ही शाळा अनेक पनवेलकरांना घडविणारे विद्यापीठ आहे. साठच्या दशकात सुरू झालेली दिवा-पनवेल ही रेल्वे पनवेलकरांसाठी वरदान ठरली. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांतील होतकरू तरुणांनी पनवेल गाठले. यातील अनेक तरुण मुंबईत याच रेल्वेने नोकरीसाठी जात होते. जुन्या पनवेल रेल्वे स्थानकावर अनेक हिंदी चित्रपटांचे शूटिंग होत होते.

सिमेंटच्या जंगलाचा वेढा

पनवेल शहराच्या चारही बाजूंनी प्रचंड निसर्गसंपदा आहे. परंतु आता या संपदेला शहरीकरणाने वेढा दिला आहे. कधीकाळी घनदाट जंगलाचा पट्टा आता सिमेंटच्या जंगलांनी व्यापला आहे. मुंबई आणि नवी मुंबईची नागरीकरणाची क्षमता संपुष्टात आल्यानंतर नागरीकरणाने थेट पनवेलसभोतालच्या गावांमध्ये प्रवेश केला आहे. पनवेलमधील वाडय़ांनी आणि तलावांनी या गावाची ओळख निर्माण केली होती. ती आता काही प्रमाणात शिल्लक आहेच, पण आता त्यातील काही अवशेष हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शहरीकरणाचा फुगलेला फुगा याला कारणीभूत आहे. कधीकाळी गाव आणि हिरवाईने नटलेल्या पनवेलमध्ये आता गाव परंपरेच्या अगदी काहीच आठवणी शिल्लक आहेत. त्यामुळे पानवेलींचे गाव म्हणून ओळखले जाणारे पनवेल आता बहुआयामी ओळखीचे बनले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article onpanvel village
First published on: 28-12-2017 at 01:51 IST