या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिलिंद शिंदे, एव्हीएम इंजिनीअरिंग

एअरकंडिशनरचा जमाना येण्यापूर्वी थंड हवेसाठी पंख्यांना पर्याय नव्हता. अशात औद्योगिक पंख्याचे महत्त्व तर अन्यन्यसाधारण होते. मोठ मोठे सभारंभ, रेल्वे स्थानके, आणि उद्योग या ठिकाणी लागणाऱ्या विविध प्रकारच्या एअर सक्र्युलेटर पंख्याचे उत्पादन रबाले येथील एक उद्योजक गेली २५ वर्षे करीत आहेत. जीवनात कर्मयोगाला अत्यंत महत्त्व देणारे मिलिंद शिंदे यांनी पंखा उत्पादनाची एक ‘हवा’ औद्योगिक क्षेत्रात तयार केली आहे. त्यामुळेच क्रॉम्प्टन, बजाज, उषा, आर. आर. केबल यांच्यासाठी पंखे बनविण्याचे काम शिंदे यांची एव्हीएम इंजिनीअरिंग करीत आहे. देश-विदेशातील कानाकोपऱ्यात एव्हीएमचे पंखे आज ब्रॅण्डेड कंपन्यांच्या नावाने हवा देत आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या वसंत शिंदे यांचा मुलगा मिलिंद यांनी इंजिनीअरिंगमध्ये पदविका प्राप्त केल्यानंतर सर्वसामान्य मराठी माणसाप्रमाणे गोदरेजमध्ये नोकरी पत्करली. सात-आठ महिने नोकरी केल्यानंतर नागपूर मध्ये या तरुणाने एक आजारी कारखाना पूर्ववत सुरू करण्याचे आव्हान स्वीकारले. अल्पावधीत हा कारखान्यात चांगले उत्पादन सुरू झाले. मुंबई जीवनाशी एकरूप झालेल्या शिंदे यांना नागपूर हवा पचनी पडली आणि एक वेगळे उद्योग विश्व हाताळताना नागपूर मधील वास्तव्य चांगले वाटू लागले. याच वेळी वडिलांनी मुंबईत येण्याचा आग्रह धरला. मुलाचे दोनाचे चार हात करणे हा त्यामागे उद्देश होता. मुंबईत न आल्यास संबंध तोडण्याची धमकीदेखील वसंत शिंदे यांनी दिली. ती मात्रा मिलिंद शिंदे यांना लागू पडली मात्र त्याच वेळी सुखवस्तू नोकरी सोडून मुंबईत परतावे लागल्याने निराश झालेल्या मिलिंद शिंदे यांनी वडिलांकडे आता नोकरी न करण्याची अट घातली.

मुंबई टाळता यावी यासाठी नोकरीऐवजी उद्योगाचा पर्याय वडिलांसमोर ठेवण्यात आला होता. त्याचा वडिलांनी स्वीकार केला आणि भाविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटीतील जवळपास पाच लाख रुपये मुलाला उद्योगासाठी दिले. त्या वेळी इतकी मोठी रक्कम सर्वसामान्य मराठी माणसाने उद्योगासाठी लावणे एक मोठी जोखीम मानली जात होती. वडिलांनी उद्योगासाठी दिलेली रक्कम हाच मििलद शिंदे यांच्या जीवनातील महत्त्वाचे वळण ठरले. स्वत:कडे शिल्लक असलेले काही रक्कम आणि वडिलांनी भविष्याची तरतूद तोडून दिलेली रक्कम अशा भांडवलावर लालबागला राहणाऱ्या शिंदे यांनी ठाण्यात लाल रो कम्पाऊन्डमध्ये पंख्याच्या कंपोनन्टसाठी लागणारी छोटीशी बेअरिंग वॉशर बनविण्याचा कारखाना सुरू केला. एक भाची, आई, वडील, पत्नी यांच्या नावाच्या आद्याक्षरापासून तयार करण्यात आलेल्या एव्हीएम कंपनीचा श्री गणेशा प्रथम भाडय़ाच्या जागेत करण्यात आला. मराठी उद्योजक म्हणून टाकण्यात आलेले हे पाऊल यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी शिंदे यांच्यावर येऊन ठेपली.

वडिलांनी आयुष्याची पुंजी उद्योगासाठी दिल्याने ती जबाबदारी मोठी होती म्हणून शिंदे यांनी रात्रीचा दिवस करून हा उद्योग भरभराटीस आणला. यात शिंदे यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंबाचे मोठे योगदान असल्याचे ते सांगतात. नऊ लाख आर्थिक उलाढाल असलेला हा उद्योग आता पन्नास कोटींच्या घरात पोहोचला आहे. ११० कामगारांच्या कुटुंबासाठी हा उद्योग एक आधार झाला असून शिंदे कुटुंबाने त्यांच्या कामगारांना आपल्या कुटुंबाप्रमाणे सामावून घेतले आहे. रबाले येथील डब्लू (३२८ व३२९) विभागात दोन कारखाने एकत्र करून तयार करण्यात आलेल्या एव्हीएम कंपनीचे आज पंखे बनविणाऱ्या सर्व राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपनीत एक नाव तयार झाले आहे. आखाती आणि दक्षिण अफ्रिकेत भारतातील बडय़ा कंपन्याचे औद्योगिक पंखे विकले जातात. त्या वेळी पंख्यांची गुणवत्ता आणि सुबकता यावरून या कंपन्यावर एव्हीएमचे नाव नसताना देखील हे पंखे एव्हीएमनेच बनविल्याचे अधिकारी वर्ग ओळखत असतात.

सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत काम करणाऱ्या शिंदे स्वत: आजही काम करण्यास तयार असतात. काम हीच आपल्यासाठी ऊर्जा असल्याचे शिंदे सांगतात. पेजरच्या काळात क्रॉम्प्टनमधून शेवटच्या क्षणी कम्पोनंटची मागणी होत असे, त्या वेळी मागणी तसा पुरवठा देऊन शिंदे यांनी क्रॉम्प्टनमध्ये एक वेगळी ओळख तयार केली होती. जादा कामाच्या बदल्यात कमी दर देण्याची किमया याच क्रॉम्प्टनमध्ये शिंदे यांनी केल्याने क्रॉम्प्टनने नंतर अनेक कामे एव्हीएमला दिली. १९९८ मध्ये एव्हीएमने एअर सक्र्युलेटर बनविण्यास सुरुवात केली. त्यासाठी विविध प्रकारचे अ‍ॅटोमेशन करण्यात आले. पंख्याच्या जगतात अलमोडा कंपनीची मोठी स्पर्धा क्रॉम्प्टनला होती. त्याचा सामना करण्याचे मोठे आव्हान एलव्हीएम कंपनीने पेलले आहे. क्रॉम्प्टनने गोव्यात स्थलांतर केल्यानंतर एव्हीएमने गोव्यात जाण्याचा विचार केला होता, पण तेथील कामगार समस्या लक्षात घेऊन रबाळे येथे राहून या स्पर्धेला तोंड दिले गेले. एअर सक्र्युलेटर पंख्याबरोबच एव्हीएम आता एक्स्झॉस्ट पंख्यदेखील बनवीत आहे. दुसऱ्या कंपन्यांच्या ब्रॅण्डची पत राखताना स्वत: एक ब्रॅण्ड तयार करायचा राहून गेल्याची खंत शिंदे यांची आहे. त्यामुळे भविष्यात एव्हीएम फॅन बाजारात दिसून येईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avm engineering milind shinde
First published on: 27-07-2017 at 01:27 IST