शिवसेनेतील दुफळीनंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले. मात्र, पनवेलमधील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल चिन्हाचा प्रचार करण्यासाठी आलेल्या काळातील जुन्या छायाचित्रांची आठवण समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करुन दिली आहे. तसेच मशाल चिन्ह आम्हाला नवीन नाही, असा संदेशही शिवसैनिकांनी दिला आहे.
हेही वाचा- ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या नावाचे शिंदे गटाचे पहिले कार्यालय नवी मुंबईत
शिवसेनेचे पनवेलचे माजी तालुकाप्रमुख आत्माराम गावंड यांनी हे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यावेळेच्या झुंजार मत या वृत्तपत्राने हे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. १९८४ साली राज्यातील निवडणूकांमध्ये ५५ जागांवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळेस पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघासाठी सुधाकर पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी पनवेल येथील नगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयाच्या इमारतीजवळील मैदानात बाळासाहेब ठाकरे आले होते. त्याकाळी सेनेचे जिल्हाप्रमुख माधवराव भिडे हे होते. तर संपर्कप्रमुख सुधाकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पाटील व भिडे यांच्यासोबत रमेश गुडेकर व आत्माराम गावंड ही मंडळी ठाकरे यांच्यासोबत छायाचित्रात दिसत आहेत. त्यावेळी शिवसेनेचे वर्चस्व पनवेलमध्ये अतिशय कमी होते. मात्र, या उलट कम्युनिस्टवादी असणा-या शेतकरी कामगार पक्षाचा पनवेल व उरण हा बालेकिल्ला होता. कॉंग्रेस व शिवसेनेचा प्रचार करणे हे सुद्धा कार्यकर्त्यांना कठीण होते. सभा घेणे, प्रचार कऱणे, झेंडे व पक्षाच्या नावाच्या पाट्या लावल्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती.
हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
तशातही बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार देऊन त्या उमेदवाराच्या निवडीसाठी पनवेलमध्ये येऊन प्रचार केला. सुधाकर पाटील यांच्या निवडणूकीमध्ये शेकापचे अनेक वर्षे आमदार असलेले दत्तूशेठ पाटील हे विजयी झाले होते. शेकापची त्यावेळी खटारा हे निवडणूक चिन्ह (निशाणी) होती. तत्कालीन आमदार दत्तूशेठ यांचे पूत्र बाळाराम पाटील हे विद्यमान कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. आत्माराम गावंड हे छायाचित्रासोबतच्या आठवणींबाबत सांगतात की, स्वर्गीय पत्रकार भरत कुरघोडे यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांकात छायाचित्रांचा संग्रह साप्ताहिक झुंजारमतमध्ये प्रसिद्ध केला होता.
