उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे देण्याची भूमिपुत्रांच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मात्र ज्या दिबांसाठी भूमिपुत्रांनी आंदोलन आणि लढा पुकारला आहे. त्या दि.बा.पाटील यांनी आयुष्यात नेहमीच बहुजनांच्या हक्कांसाठी लढ्याचा मार्ग निवडला. ते प्रत्येक मागणी आणि हक्क हा लढल्याशिवाय काही मिळत नाही. हे वाक्य नेहमी ते आपल्या भाषणात सांगत असत. आणि केवळ सांगून व सल्लाच देऊन ते थांबले नाहीत. त्यांनी आयुष्यभर हे तत्व पाळत जीवनाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत त्यांनी शेतकरी आणि भूमिपुत्रांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक पणे आंदोलन, लढे आणि संघर्ष केला.

या त्यांच्या संघर्षाची कहाणी ही ऐन तारुण्यात सुरू झाली. वकील झाल्यानंतर पनवेल शहरातून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. गोरगरीब, कष्टकरी शेतकरी समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. पनवेल मध्ये भाड्याच्या घरात वास्तव्या करणाऱ्या दिबांचे स्वतःचे घर नव्हते. मात्र जनतेने पुढाकार घेत त्यांच्यासाठी पनवेल बावन बांगला येथे शेतकरी आणि कष्टकरी समाजाने त्यांच्यासाठी घर बांधले आजही ही हे घर अस्तित्वात आहे. या घराला त्यांनी त्यांच्या विचार आणि व्यक्तिमत्त्वाच स्थान देत या घराचे नाव त्यांनी “संग्राम” ठेवले.

जनतेने दिबांवर आयुष्यभर प्रेम केलं कारण त्यांच प्रेम जनतेवर होत. त्यामुळे त्यांना घर आणि वाहने ही लोकवर्गणीतून दिली गेली. त्यांच्या निवडणूकीसाठी जनतेकडून निधी गोळा केला जायचा तर निवडणूकीचा सर्व खर्च हा गावोगावचे कार्यकर्ते स्वतःच्या खिशातून करीत होते. (आज ज्यांना निवडणूक लढवायची आहे. त्यांना जनतेसह आपल्या कार्यकर्त्यांना निधी पूरवत नाहीत तो पर्यंत कार्यकर्ते हालत नाहीत) काही ठिकाणी याला अपवाद आहे. मात्र बहुतांशी ज्याची निवडणूक त्यांची निवडून येण्याची क्षमता ही आर्थिक पाठबळ यावरून ठरविली जाते. मात्र दिबा याला आयुष्यभर अपवाद होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने आणि लढे झाले यात महत्वाचा आणि राज्यव्यापी लढा म्हणजे १६ व १७ जानेवारी १९८४ ला झालेला उरण शेतकरी लढा आहे.

या लढ्यात दास्तान व नवघर येथे एकूण पाच शेतकरी पोलीसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले.  या लढ्याला संपुर्ण राज्यात प्रतिसाद मिळाला. लढ्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक शहरात मोर्चे, निदर्शने झाली बंद पाळण्यात आला. विशेषतः या काळात मुंबईही बंद झाली होती. याच लढ्याने देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा दर आणि पुनर्वसनाचा हक्क प्रस्थापित करण्याची दिशा मिळाली. यातूनच शेतकऱ्यांना विकसित भूखंड देणारे तत्व निर्माण झाले.

आज केंद्र सरकारच्या २०१३ च्या भूसंपादन आणि पुनर्वसन कायद्यात देशात शेतकऱ्यांना मोबदल्यासह त्यांच्या संपादीत जमिनीच्या २० टक्के विकसित भूखंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याची सुरुवात दिबांच्या लढ्यातून झाली आहे. उरण शेतकरी आंदोलना संदर्भात दिबा नेहमीच एक वाक्य म्हणायचे “हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही ,जाऊ द्यायच नसत.” मात्र सद्या शेतकरी, भूमीपुत्र, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या उत्क्रांतीसाठी आयुष्यभर संघर्ष आणि लढा देणाऱ्या लोकनेत्याच येथील भूमीपुत्रांच्या अस्मिता आणि अस्तित्वाच्या टिकावी यासाठी नवी मुंबई या त्यांच्या कर्मभूमीतील विमानतळाला नाव देण्यासाठी ही येथील जनतेला लढा द्यावा लागत आहे.

त्यामुळे दिबांच्या आयुष्यातील तत्वा प्रमाणे भूमिपुत्रांना लढावे लागत आहे. ते ” लढल्या शिवाय काही मिळत नाही.”याची प्रचिती आता येत आहे. हा लढा कायम राहणार की केंद्र आणि राज्य सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाची घोषणा करणार याकडे भूमीपुत्रांचे लक्ष लागून राहिले आहे.