नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचले असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (२७ ऑगस्ट) अंतरवली सराटीतून निघालेला आंदोलकांचा जथ्था मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. नवी मुंबईच्या मार्गाने हजारोंच्या संख्येने हे आंदोलक २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहेत.

तत्पूर्वी या पार्श्वभूमीवर भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह खारघर परिसरात भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले आहेत. भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्या नावांसह झळकलेल्या या बॅनरमध्ये फडणवीस यांचा मोठा फोटो असून “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो” असा मजकूर आहे. त्यासोबतच “मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि ते उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस” असे गौरवोद्गारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहिण्यात आले आहेत.

यापूर्वी जरांगे यांनी फडणवीस यांच्या मातोश्रींविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग उसळले होते. त्यावर जरांगे यांनी ते शब्द चुकून निघाल्याचे सांगत माफीही मागितली होती. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ खारघरमध्ये झळकवलेले बॅनर आता विशेष चर्चेचा विषय ठरले आहेत.

अंतरवालीतून निघताना जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले. परंतु त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे कौतुक केले. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांनाही नवा रंग चढला आहे.