सीबीडी येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम १ ते ६ नोव्हेबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक नियंत्रित आणि सुरळीत चालावी यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही मार्गावर प्रवेशबंदी, तसेच काही मार्गिकेत बदल केले आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने या कालावधीत उड्डाणपुलावरील एकच लेन वाहनांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. तर दोन मार्गिका दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सीबीडी सर्कल येथून कोकण भवनच्या दिशेने उजवीकडे वळणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र कोकण भवन, सीबीडी, सेक्टर ११ व १५ तसेच पाम बीचकडे जाण्यासाठी सीबीडी सर्कल येथून उजवीकडे सीबीडी पोलीस ठाणे, महाकाली चोकी, गावस्कर मैदान, पार्क हॉटेल तसेच भाऊ पाटील चौकातून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पनवेलहून सीबीडी सेक्टर १ ते ९ येथील वसाहत भागामध्ये जाणाऱ्या वाहनांनादेखील सीबीडी सर्कल येथून प्रवेश बंद असेल. मात्र या वाहनांसाठी कोकण भवनच्या दिशेने डावीकडे वळण घेऊन भाऊ पाटील चौकातून उजवीकडे पार्क हॉटेल मार्गे, गावस्कर मैदानावरून इच्छितस्थळी जाता येईल.