पनवेल : पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने विविध मंदिरांमध्ये तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी पनवेल शहरातील विविध मंदिरांमध्ये श्री रामांची आरती, रामनामाचा जप, विविध यज्ञ असे धार्मिकविधी करण्यात आले आहेत. सोमवारी मोठ्या संख्येने विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महाप्रसादासह, रामनामाचे जप अशा विधींचे आयोजन रहिवाशांनी केले.

दुपारी साडेबारा वाजता श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामभक्तांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांना लाडू भरवून आणि नाचून भक्तांनी हा आनंद व्यक्त केला. भजन, किर्तन, रामनामाचा जप, सुंदरकांड, रामरक्षा पठन असे विविध धार्मिक सोहळ्याचे सामुहिक कार्यक्रम मंदीरांसह विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये करण्यात आले. शहरांप्रमाणे गावपातळीवर तेवढाच उत्साह राम भक्तांमध्ये दिसत होता. सोमवारचा श्री राम प्राणप्रतिष्ठा दिवस साजरा करण्यासाठी पनवेलमधील ७० हून अधिक गावांमध्ये महिलांनी स्वच्छता मोहीम शनिवार व रविवारपासून हाती घेतली. यामध्ये गावातील मुख्य रस्ते, मंदीरांचा परिसर पाण्याने धुवून स्वच्छ कऱण्यात आला. तसेच रस्त्यांकडेला रांगोळी काढण्यात आली. या स्वच्छता मोहीमेमध्ये महिलांना तरुणांची साथ मिळाली.

हेही वाचा…नवी मुंबईतील मंदिरांची स्वच्छता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरामध्ये भगव्या झेंड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. ५० ते पाचशे रुपयांमध्ये एक झेंडा विक्री केला जात होता. रिक्षाचालक, दुचाकीचालक तसेच मोटारींवर हे झेंडे लावून गाड्या शहराच्या रस्त्यावरुन धावत होत्या. रविवारपासून ‘श्री रामा’च्या नामाची घोषणा शहरीभागात देणारे दुचाकीस्वार शहरातील रस्त्यावरुन फिरत होते. पनवेल शहरातील शिवाजी रोड मार्गावरील राम मंदीरात विशेष आरास करण्यात आली होती. शिवाजी मार्गावर विरुपाक्ष मंदीर, हनुमान मंदीर अशा ठिकाणी रस्त्यावर पताका लावून सोमवारच्या प्राणप्रतिष्ठा दिवस साजरा करण्यात आला. आकुर्ली गावामध्ये भजन किर्तनासोबत अयोध्या येथील श्री राममंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रेक्षपण गावक-यांसाठी आयोजित करण्यात आले होते.