नवी मुंबई : मध्य रेल्वे मुंबई विभागात रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी महत्त्वाचे अभियांत्रिकी आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी मेगा ब्लॉक लागू करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक
माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत ब्लॉक असेल.
या दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १०.३६ ते १५.१० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा स्थानकापासून धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, त्या त्यांच्या सर्व निर्धारित स्थानकांवर थांबतील. या गाड्या साधारणतः १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
तसेच ठाणेच्या पलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावरून पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद गाड्याही मुलुंड स्थानकावरून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा स्थानकापर्यंत निर्धारित स्थानकांवर थांबत जलद मार्गावर परतवण्यात येतील.
कुर्ला-वाशी हार्बर मार्गावर ब्लॉक
कुर्ला ते वाशी दरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ब्लॉक असेल.
त्यामुळे सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या १०.३४ ते १५.३६ या वेळेतील डाऊन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या १०.१६ ते १५.४७ या वेळेतील अप गाड्याही रद्द राहतील.
विशेष सेवा
या ब्लॉकदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी–कुर्ला आणि पनवेल–वाशी मार्गांदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत.
तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सहकार्य करावे आणि प्रवासाच्या आधी वेळापत्रक तपासावे, असे आवाहन केले असून, होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.