उरण : येथील द्रोणागिरी नोड मधील मार्गाच्या आणि उड्डाणपूलांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही सिडकोची आहे. मात्र सिडकोच्या दुर्लक्षामुळे नवघर पुलावरील खड्डे आणि बोकडवीरा शेवा तसेच बोकडवीरा येथील वायू विद्युत केंद्रा नजीकच्या पुलाच्या खड्डे आणि मार्गावरील काटेरी झुडपांमुळे प्रवासी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील खड्डे भरण्याची तसेच वाढलेली झुडपे छाटण्याची मागणी करण्यात आली आहे.पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यांच्या आणि झुडपांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात अनेक ठिकाणच्या सर्कलच्या भिंती तुटल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यासाठी बसविण्यात आलेले कठडे ही मोडकळीस आले आहेत.
याचा फटका नागरिक आणि वाहन चालकांना बसत आहे. द्रोणागिरी नोड मधील नवघर ते खोपटे दरम्यानच्या मार्गाला भेंडखळ पेट्रोल पंप,खोपटे पूल चारफाटा आदी ठिकाणच्या मार्गाला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून सातत्याने जड कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या भल्या मोठ्या खड्ड्यात कंटेनर वाहन कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. याच परिसरात यापूर्वी दुचाकी तसेच एसटी बसला अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारचे खड्डे नवघर उड्डाण पुलावर ही पडले आहेत. या पुलावरून प्रवासी वाहने व विद्यार्थी प्रवास करीत आहेत.त्यातच गेल्या काही दिवसांपासून उरण परिसरातील पाऊस थांबला आहे. त्यामुळे रस्ते कोरडे झाले आहेत. परिणामी द्रोणागिरी व उरण पनवेल मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेल्या खडीमुळे धूळ निर्माण होऊ लागल्याने प्रवासी आणि नागरीकांना धुळीचा सामना करावा लावत आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.
सातत्याने सुरू असलेल्या वाहनांमुळे पावसाळ्यात रस्त्याला झालेले खडे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी उखडून पडू लागली आहे. त्यातून धूळ तयार होत आहे. ही धूळ वाहनांमुळे वातावरणात पसरू लागली आहे. या धुळीमुळे समोरचे वाहन आणि व्यक्ती दिसत नाही. या परिसरात उघड्यावर काम करणाऱ्या मजूरांच्या व वाहन चालकांच्या पोटात दररोज मुठभर धुरळा जात असल्याची शक्यता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. तसेच त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या श्वसनाचे आजारही बालवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्गावरील ही धूळ कमी करण्यासाठी सिडको तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश चंद्रकांत घरत यांनी केली आहे.
उरणकरांची दिवाळी खड्ड्यात : पाऊस थांबून अनेक दिवस झाले आहेत. मात्र त्यांतरही सिडको किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने उरणच्या खड्डेमय मार्गाच्या दुरुस्ती कडे दुर्लक्ष सुरू आहे. वाढत्या तापमानात या खड्ड्यातील धूळ मार्गावर पसरू लागली असून त्याचाही सामना आता येथील प्रवासी आणि नागरिकांना करावा लागत आहे.