मुले, महिलांचा सहभाग; वनसंपदा वाचविण्यासाठी पालिका आयुक्तांना साकडे, परस्पर संगनमताने झाडांची कत्तल
सीवुड रेल्वे स्थानकाजवळील पदपथावर लावलेल्या झाडांची कत्तल करण्यास नवी मुंबई पालिकेने परवानगी दिली आहे. एल अॅण्ड टी कंपनीच्या प्रकल्पासाठी ही परवानगी देताना नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. याविरोधात येथील शेकडो नागरिकांनी झाडांच्या रक्षणासाठी ‘चिपको आंदोलन’ केले. या आंदोलनात मुले आणि महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता.
सीवुड रेल्वे स्थानक संकुल सिडकोने साडेतीन हजार कोटी रुपयांना विकले आहे. याबाबत एल अॅण्ड टी कंपनीशी व्यवहार करण्यात आला आहे. संकुलासाठी पदपथावरील झाडे अडसर ठरत आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाशी संगनमत करून ८० झाडे तोडण्यासाठी परवानगी मागण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही झाडे तोडण्यात येणार असल्याचे चिपको आंदोलकांनी सांगितले.
याविरोधात प्रथम शिवसेनेचे सीवुड शाखाप्रमुख समीर बागवान यांनी आवाज उठवला होता; मात्र पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर येथील नागरिकांनी शुक्रवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. आम्ही कंपनीला झाडे कापू देणार नाही, असा पवित्रा घेत रविवारी महिला, वृद्ध नागरिक आणि मुलांनी झाडांना मिठय़ा मारल्या.
या वेळी सीवुड रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन, कवी कुसुमाग्रज वाचनालय, सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटना आणि हरित नवी मुंबई या संघटनांनी सहभाग घेतला होता.
झाडे वाचविण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना साकडे घातले जाणार आहे. उद्यान विभागाने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत ३७ झाडे तोडून स्थलांतरित करण्याची परवानगी दिल्याचा दावा केला आहे; मात्र या परिसरातील वृक्षसंपदा घटवून कंपनीचा फायदा केला जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या संदर्भात पालिका उद्यान विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी चौकशी करून आदेश देतो, असे ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना सांगितले. कंपनीने येथील पदपथांची तोडफोड केल्याबद्दल १४ लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. एका प्रसिद्ध वास्तुविशारदाच्या दबावामुळे महापालिका प्रशासन या कंपनीला झुकते माफ देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.