नवी मुंबई : नवी मुंबईत पाम बीच मार्गावर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाणथळींच्या जमिनी निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याच्या निर्णयावर शहरातील पर्यावरण प्रेमींकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. असे असले तरी येथील राजकीय वर्तुळात मात्र या मुद्दयावर कमालीची शांतता दिसून येत आहे. नवी मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात शहराचा विकास आराखडा राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. या आराखड्यात शहरातील हरित पट्टेही नागरी वसाहतींसाठी खुले करण्यात आले आहे. पाणथळींच्या जागा, हरित पट्टयांवरील आरक्षणे उठवली जात असताना आतापर्यत या मुद्दयावरुन शहरातील एकाही राजकीय पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

नवी मुंबईची ओळख ‘फ्लेमिंगो सीटी’ अशी बनविणाऱ्या या पक्ष्याच्या अधिवासाची ठराविक अशी काही ठिकाणे गेल्या काही वर्षात तयार झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरुळ-सीवूड परिसरात पाम बीच मार्गास खाडीकडील बाजूस असलेल्या पाणथळींच्या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो येत असतात. मुंबई महानगर प्रदेशातील पर्यावरण प्रेमी पर्यटकांसाठी ही ठिकाणे आकर्षणाचे केंद्र ठरत असून मोठया संख्येने पर्यटक फ्लेमिंगो तसेच दुर्मीळ अशा पक्ष्यांच्या दर्शनासाठी या भागात येत असतात.

Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
supreme court chief justice dy chandrachud
“न्यायालयावर विशिष्ट गटाचा दबाव…”, हरीश साळवे यांच्यासह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

हेही वाचा…पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात

खाडी तसेच पाणथळींच्या किनाऱ्यांवरची रपेट हा देखील अनेकांसाठी आकर्षणाचा आणि आवडीचा विषय ठरला आहे. दरवर्षी वाढणारी फ्लेमिंगो पक्षी आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने काही वर्षांपासून या शहराची ओळख ‘फ्लेमिंगो सीटी’ अशी करण्यास सुरुवात केली आहे. याच भागात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फ्लेमिंगो पर्यटन महोत्सव बनविण्याची संकल्पनाही मध्यंतरी महापालिकेकडून पुढे आली होती. असे असताना या प्रवासी पक्ष्याच्या अधिवासाची ठिकाणेच महापालिकेच्या विकास आराखड्यात रद्द करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हेही वाचा…फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार

दोन्ही आमदार गप्प, विरोधकही गोंधळलेले

पाम बिच मार्गावरील ५० ते ६० हेक्टर परिसरात विस्तारलेल्या पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा महापालिकेच्या निर्णयाला आठवडा होत आला तरी याविषयी शहरातील राजकीय वर्तुळात मात्र कमालीची शांतता दिसून येत आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे भाजपचे आमदार आहेत. शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर एरवी महापालिका मुख्यालयाचे दरवाजे ठोठाविणारे आमदार नाईक यांनी राज्य सरकारकडे सादर झालेल्या विकास आराखड्यावर अजून जाहीरपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही. नाईक यांच्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोडत असलेल्या आडवली-भूतवली परिसरातील रिजनल पार्कचे आरक्षणही उठविण्यात आले आहे. या मुद्दयावरही अद्याप नाईक यांची भूमिका जाहीर झालेली नाही. पाणथळींचे मोठे क्षेत्र आमदार मंदा म्हात्रे यांच्या विधानसभा मतदारसंघात येते. त्यांनीही याविषयी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

हेही वाचा…रायगड जिल्ह्यातील १३ मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तीसाठी कार्यवाही

मुख्यमंत्री समर्थक मैानातच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हे नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या विरोधकांच्या भूमिकेत असतात. नवी मुंबईत एरवी विरोधकांच्या भूमिकेत वावरणारे ही मंडळी पाणथळी आणि रिजनल पार्कच्या बदललेल्या आरक्षणाबाबतीत अजूनही मैानात असल्याचे दिसून येते. नेरुळ-सीवूड भागातील पाणथळ क्षेत्र वाचावे यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील पर्यावरण प्रेमी अनेक महिने आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे स्थानिक पदाधिकारी या आंदोलनात काही प्रमाणात सहभागी होताना यापूर्वी पहायला मिळाले आहेत. असे असले तरी विकास आराखडा जाहीर झाल्यापासून या पक्षाच्या नेत्यांनीही अद्याप जाहीर भूमीका मांडली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याविषयी भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने मात्र नाईक साहेब लवकरच यासंबंधी आपली भूमिका जाहीर करतील अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर दिली. मुख्यमंत्री समर्थक एका नेत्याने आमचा अभ्यास सुरु आहे, असे सांगितले तर शिवसेना (उबाठा) गटाच्या एका पदाधिकाऱ्याने यावर आंदोलनाची दिशा ठरत असून आमचे नेते जाहीर करतील असे सांगितले.