उरण : सिडको आणि जेएनपीएकडून बंदरासाठी उरणमध्ये करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे येथील गावामध्ये भर उन्हाळ्यात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या घरांचे आणि सामानाचे नुकसान होऊ लागले आहे. याकडे सिडको आणि जेएनपीएचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जेएनपीएमधील जसखार गावात तसेच द्रोणागिरी नोडमधील सिडकोच्या साठवण तलाव (होल्डिंग पॉण्डची) झाकणे तुटल्याने भरतीचे पाणी थेट नवघर कुंडेगावात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १५ ते २० घरांमध्ये हे खाडीचे पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे आणि फ्रीज, वॉशिंग मशीनसारख्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिडको, जेएनपीटी आणि खाजगी विकासकांच्या विकासकामांचा धडाका उरणमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा फटका बसला आहे. गुरुवारी आलेल्या भरतीचे पाणी द्रोणागिरी नोडमधील काही गावांमध्ये शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुंडेगाव येथे तर भरतीचे पाणी थेट काहींच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भरतीचे पाणी नागरी परिसरात येऊ नये म्हणून सिडकोने या भागात पाच धारण तलाव (होल्डिंग पॉण्ड) बांधले आहेत. यापैकी बरेचसे तलाव हे गाळाने भरल्याने होल्डिंग पॉण्डमधील पाणी गावात शिरू लागले आहे.

पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजवले

सिडको, जेएनपीटी आणि काही खाजगी विकासक, कंपन्या यांनी उरण तालुक्यातील अनेक नैसर्गिक नाले मातीच्या भरावाने बुजवून टाकल्याने पावसाचे तसेच समुद्राच्या भरतीचे पाणी निचरा होत नाही. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला असून मोठ्या भरतीच्या वेळेस हमखास पाणी शिरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे द्रोणागिरी नोडमध्ये हे प्रकार वारंवार घडतात.

होल्डिंग पॉण्डकडे दुर्लक्ष

सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले होल्डिंग पॉण्ड गाळाने भरले आहेत तसेच पाणी नियंत्रण करणारी झाकणे तुटली असल्यामुळे मोठ्या भरतीचे पाणी गावात शिरले आहे. गावातील काही घरांमध्ये या भरतीचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. यिा होल्डिंग पॉण्डची दुरुस्ती करण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.

डासांचा त्रास

सिडकोने बांधलेल्या साठवण तलावात गाळ साचला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खारफुटीही वाढली आहे. त्यामुळे या परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.