DB Patil Son Atul Patil on Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. नवी मुंबई विमानतळास माजी खासदार दिबांचे नाव देण्याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी संकेत दिला नसल्याने भूमिपुत्रांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. अशातच दि बांचे सुपुत्र आणि कुटुंबियांनी ही या बाबत आपली प्रतिक्रिया मांडत नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाला माजी खासदार दि .बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २०२१ पासून रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या सागरी जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात आहे. यासाठी दि.बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकार तसेच केंद्रीय विमान उड्डायन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. हे नाव देणार कारण राज्य सरकारकडे एकमेव दिबांच्या नावाचा ठराव आहे. या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली असल्याची माहीती ३ ऑक्टोबरला मुंबईतील अतिथीगृहात झालेल्या सर्व पक्षीय नामकरण समिती सोबतच्या बैठकीत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याचप्रमाणे यावेळी केंद्राकडून नामकरणाचे नवे नियम तयार केले जात असल्याचे स्पष्ट करीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले होते. आज, बुधवारी नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनावेळी दिबांच्या पुत्र अतुल पाटिल यांच्यासह कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले होते. आज झालेल्या लोकार्पण सोहळ्यात नवी मुंबई विमानतळाला देण्यात येणाऱ्या नावा बद्दल काहीतरी हिंट दिली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नेत्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा उल्लेख झालेला दिसून आला नाही. यामुळे स्थानिक भूमीपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.
दि. बा. पाटलांचे सुपुत्र अतुल पाटील काय म्हणाले?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांनी देखिल दिबांबद्दल गौरवोद्गार काढले. पण भाषणात कुठेच नाव देण्यात येईल असा साधा उल्लेख होईल असे वाटलं होते. पण, ते झालेलं नाहीये. त्याबाबत वाईट वाटते आहे. परंतु त्याच्याबरोबर एवढी खात्री आहे की दि बां पाटिलांच्या नावाशिवाय दुसरे कुठले नाव लागणार नाही. तसेच १०० टक्के आशा होती कुठेतरी नामाकरणाबाबत उल्लेख होईल. पण असुदे आपण तीन महिने वाट बघुया, नक्कीच नाव लागेल.
कुटुंबियांचे म्हणणे काय ?
विमानतळाला दि बा पाटिल यांचे नाव देण्याची घोषणा नाही पण उल्लेख करायला हरकत नव्हती. त्यांनी म्हणायला हवे होते की याचे नामकरण व्हायचे आहे आणि लोकनेते दि बा पाटिल यांचे नाव देण्यात येईल. असे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी आश्वासन द्यायला हवे होते.