पनवेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन पार पडले. या सोहळ्याला सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. विमानतळाचे नामकरण ‘दि. बा. पाटील’ यांच्या नावाने होईल, अशी अपेक्षा अनेक प्रकल्पग्रस्तांना होती. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी सर्वांचे लक्ष मंचाकडे लागले होते.
परंतु, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात दि. बा. पाटील यांच्या योगदानाचा उल्लेख केला असला तरी विमानतळाच्या नावाविषयी कोणतीही औपचारिक घोषणा केली नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणात नावाबाबत कोणतेही सूतोवाच केले नाही. त्यामुळे उद्घाटन सोहळा संपताच उपस्थितांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी सोहळ्याच्या मंडपातच घोषणाबाजी सुरू केली. “या विमानतळाला नाव फक्त दि. बा. पाटील यांचेच हवे” अशा घोषणा देत समर्थकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यांच्या या घोषणांमुळे उपस्थितांचे लक्ष पुन्हा एकदा या विषयाकडे वेधले गेले.
प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिक दीर्घकाळापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत आहेत. दि. बा. पाटील यांनी नवी मुंबईतील शेतकऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे हक्क जपण्यासाठी आयुष्यभर लढा दिला होता. pic.twitter.com/mthiVnclZf
— chaitanya sudame (@ChaitanyaSudame) October 8, 2025
प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिक दीर्घकाळापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत आहेत. दि. बा. पाटील यांनी नवी मुंबईतील शेतकऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे हक्क जपण्यासाठी आयुष्यभर लढा दिला होता. त्यामुळे विमानतळाच्या नामकरणाबाबतचा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष दिसून आला. या उद्घाटन सोहळ्यानंतर पुन्हा एकदा या विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा राजकीय व सामाजिक पातळीवर चांगलाच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.