scorecardresearch

Premium

पनवेल: रेल्वे प्रशासनात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा 

पनवेल दिवा लोहमार्गावर शनिवारी सायंकाळी चार वाजता मालवाहूगाडीचे पाच डबे घसरल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या ३२ एक्सप्रेस गाड्यांतील प्रवाशांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले.

Disaster management has collapsed
रेल्वे प्रवाशांच्या नशिबी १६ ते १८ तासांचा प्रतीक्षा प्रवास(फोटो- लोकसत्ता टीम)

पनवेल: पनवेल दिवा लोहमार्गावर शनिवारी सायंकाळी चार वाजता मालवाहूगाडीचे पाच डबे घसरल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या ३२ एक्सप्रेस गाड्यांतील प्रवाशांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. रात्री उशीरापर्यंत डबे सुरक्षित ठेवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रविवार सायंकाळपर्यंत वेळ लागणार असल्याचे माहित असूनही रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतील विविध टर्मिनलमधून इतर रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. प्रवाशांना शनिवारची रात्र आणि रविवारच्या दुपारपर्यंत ताटकळत रेल्वेतच बसावे लागले. आपत्तीवेळी नेमकी परिस्थिती कशी हाताळावी याची माहिती मुंबई विभागात काम करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडे नसल्याने ही स्थिती पाहायला मिळाली.

याहून बिकट स्थिती कोकणातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची होती. सकाळपासून रेल्वेत बसलेले प्रवासी सायंकाळी सात वाजता पनवेल रेल्वेस्थानकात पोहचणे अपेक्षित असताना या प्रवाशांना आज सकाळी १० वाजले. १६ ते १७ तासांचा प्रतीक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या भोंगळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला. 

local passengers, panvel mumbai local, local passengers suffer due to low speed
पनवेल मुंबई लोकलची गती मंदावली, हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे प्रवाशांचे हाल
passengers hit by goods train derails near panvel passengers stuck in express from 29 hours
२९ तास रखडपट्टी; कोकण रेल्वेवर प्रवाशांचे अतोनात हाल, मालगाडी घसरल्याने अनेक गाडय़ांचा खोळंबा
42 trips of special trains increased on pune amravati and mumbai balharshah
अमरावती: प्रवाशांसाठी आनंदवार्ता; विशेष रेल्‍वेगाड्यांच्‍या ४२ फेऱ्या वाढल्‍या
Strict action by Railways
पिचकारीबहाद्दरांकडून पाच महिन्‍यांत ७.८१ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेची कारवाई

आणखी वाचा-उरण: बिग बटरफ्लाय मंथ निमित्ताने विद्यार्थ्यां मध्ये जनजागरण; फुलपाखरांच निसर्गातील महत्व विशद

पनवेल रेल्वेस्थानकातून कळंबोली स्थानकापर्यंत लोखंडाच्या कॉईल घेऊन जाणारी मालगाडीचे पाच डबे नवीन पनवेल येथे घसरले. यामुळे शनिवारी दुपारपासून आपत्तीची स्थिती निर्माण झाली. ही आपत्ती दूर करण्यासाठी किती वेळ लागेल याची निश्चित वेळेचा अंदाज स्थानकातील अधिकारी, रेल्वे प्रशासनातील तांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांना बांधता न आल्याने अनेक संकटांना सामान्य प्रवाशांना तोंड द्यावे लागले. आधुनिकतेच्या युगात मोबाईलवरुन तिकीट बुकींगसारखी सुविधा देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने या दरम्यान रेल्वेमध्ये ताटकळत बसलेल्या प्रवाशांना नेमका बिघाड दुरुस्त कधी होईल. नेमका थांबलेल्या रेल्वेगाडीचा प्रवास किती तासांनी सुरु होईल, तोपर्यंत प्रवाशांना पाण्याची सोय, नेहारी किंवा जेवणाची सोय कशी पुरविली जाईल या सर्व सोयींचा बोजवारा शनिवारच्या आपत्तीच्या घटनेवेळी विविध रेल्वेमघील प्रवाशांनी अनुभवला.

हरिशचंद्र ठाकूर, त्यांची पत्नी वैदेही आणि अडीच वर्षांचा मुलगा गौरांग हे ओरस स्थानकातून शनिवारी सकाळी ११ वाजता मांडवी गाडीतून पनवेलच्या प्रवासासाठी निघाले. ४५ मिनिटे ही रेल्वे उशीराने ओरस स्थानकात आली. त्यानंतर रात्रीच्या अंधारात अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी ती थांबविण्यात आली. रात्री सात वाजता ठाकूर कुटुंबीयांचा प्रवास पनवेलमध्ये पूर्ण होणार होता. मात्र ठाकूर कुटुंबीय प्रवास करत असलेली रेल्वे जिते स्थानकाजवळ निर्जनस्थळी थांबविण्यात आली. या रेल्वेतील प्रवासी पाण्याची बाटली खरेदी करु शकतील अशी सोय त्यावेळी नव्हती. या दरम्यान अडीच वर्षांचा गौरांग या मुलाला खोकला व तापाचा त्रास होऊ लागला. रात्रभर रेल्वे कधी पनवेल स्थानकात जाणार याचा कोणताच पुकारा रेल्वे प्रशासनाने केला नाही. मोबाईलवर लघुसंदेश सुद्धा पाठविला नाही. ही रेल्वे सकाळी १० वाजता पनवेल स्थानकात आली. पहाटे सहा वाजता सोमाटणे स्थानकापर्यंत मांडवी रेल्वेची ढक्कलगाडी थांबत थांबत आली. शेकडो प्रवासी मिळेल त्या पर्यायी वाहनचालकांकडून याचना करुन पनवेलपर्यंत पोहचले. ठाकूर परिवाराने अडीचशे रुपये तीन आसनी रिक्षाचालकांचे भाडे देऊन पनवेल गाठले. ओरस ते पनवेल या नऊ तासांचा रेल्वे प्रवासाला तब्बल १६ तास लागले.

आणखी वाचा-बेलापूर ते पनवेल दरम्यान एनएमएमटीची जादा बस सेवा

अशीच स्थिती मुंबईतील ललिता सावंत यांची झाली. सावंत यांनी रात्री १२ वाजता दादर स्थानकातून तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास सुरु केला. कुडाळ येथे सकाळी अकरा वाजता पोहचणार होत्या. मात्र दुपारी अडीच वाजेपर्यंत तुतारी एक्सप्रेस नावडेरोडला उभी करण्यात आली. ललिता यांच्या गाडीत साधी पिण्याच्या बाटलीची सोय सुद्धा रेल्वे प्रशासनाने केली नाही. अक्षरशः ललिता यांना नावडेरोड येथे उतरुन पुढील प्रवास बसने करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे रेल्वे कधी नियमित सुरु होणार, प्रतिक्षा प्रवास कधी संपणार याची माहिती देणारा पुकारा रेल्वे प्रशासनाकडून केला नसल्याने रेल्वेचा कारभार रामभरोसे असल्याचा अनुभव ललिता यांनी व्यक्त केला. पनवेल स्थानकामध्ये अनेक प्रवासी कुटुंबासहीत पुढील एक्सप्रेस कधी येईल या प्रतिक्षेत फलाटावर ठिय्या मांडून बसले होते. अनेकांनी फलाटावर बसून कुटुंबासह जेवणासाठी आणलेला डबा खाण्याची सुरुवात केली.

शनिवारी दुपारपासून तीन पाळ्या काम करुन प्रवाशांच्या प्रश्नांची संयमाने उत्तर देताना अधिकारी दिसले. स्थानकातील तिकीट तपासणीकांच्या कार्यालयाला नियंत्रण कक्षाचे स्वरुप आले होते. मुंबई व उपनगरांमधील अनुभवी अधिकाऱ्यांना आपत्तीस्थितीवरील नियंत्रणासाठी रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकामध्ये पाठविले होते. स्थानकातील या अधिकऱ्यांकडे  रेल्वेच्या गाड्या नियमीत कधी धावतील याची माहिती नसल्याने प्रवाशी आण रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये खटके उडत होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disaster management has collapsed in the railway administration mrj

First published on: 01-10-2023 at 16:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×