Discouragement of other government agencies in Navi Mumbai in clean survey ssb 93 | Loksatta

स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईतील इतर शासकीय संस्थांचा निरुत्साह

स्वच्छतेवर नवी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर खर्च करत स्वच्छतेत शहराला प्रथम क्रमांक यावा म्हणून कंबर कसली आहे. मात्र दुसरीकडे याच शहरात असलेली इतर शासकीय प्राधिकरणे या अभियानाबाबत निरुत्साही असल्याचे निदर्शनास येत आहे.

Navi Mumbai clean survey
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईतील इतर शासकीय संस्थांचा निरुत्साह (image – लोकसत्ता टीम)

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहरातील स्वच्छतेवर नवी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर खर्च करत स्वच्छतेत शहराला प्रथम क्रमांक यावा म्हणून कंबर कसली आहे. मात्र दुसरीकडे याच शहरात असलेली इतर शासकीय प्राधिकरणे या अभियानाबाबत निरुत्साही असल्याचे निदर्शनास येत आहे. आजही त्या त्या प्राधिकरणांच्या असलेल्या जागेत अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे त्यामुळे, नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःला स्वच्छता सर्वेक्षणात झोकून देवूनही या विविध कारणांमुळे शहराचा स्वच्छता मानांकन खालावत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची हाक देताच संपूर्ण देशात स्वच्छता मोहिमा सुरू झाल्या. या स्वच्छतेमध्ये सातत्य रहावे यासाठी केंद्र सरकारमार्फत देशात स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. यावर्षी राहण्याजोग्या शहरांची (इज ऑफ लिविंग इंडेक्स) स्पर्धा देखील घेण्यात येत आहे. यामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेने आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत आपल्या शहराचे नामांकन उंचावण्यासाठी सर्व शहरे स्वच्छतेबाबत जनजागृती करून स्वच्छता ठेवत आहे. नवी मुंबई महानगरपालिका पण या स्पर्धेत सहभागी होते आणि लाखो करोडो रुपये खर्च तर करतेच शिवाय आपले अतिरिक्त कर्मचारी देखील या दरम्यान कामास लावते. मात्र याच शहरात कार्यरत असलेल्या इतर शासकीय यंत्रणा मात्र स्वच्छ सर्वेक्षणात अनास्था दाखवत असतात आणि स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष करीत असतात.

हेही वाचा – नवी मुंबई : पहाटेपासून मैदानात किलबिलाट; हजारो विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सिडको, एमआयडीसी,कोकणभवन,नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, महावितरण, सार्वजनीक बांधकाम, रेल्वे विभाग, एमटीएनएल, आरटीओ, एपीएमसी आदी शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र महापालिका वगळता या शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयांना स्वतःच्याच कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतेचा विसर पडलेला असतो. शहारातील औद्योगिक वसाहतीत तर स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच बोजवारा उडालेला असतो. एकीकडे शहर स्वच्छ करण्यासोबत संबंधित प्राधिकरणाचा कचराही मनपाला उचलण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील रेल्वे पटरी लगत असलेल्या संरक्षण भिंतींना देखील रंगरंगोटी करून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, असे असले तरी दुसरीकडे यास पट्टी लागत मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे प्लास्टिक कचरा इत्यादी घाणीचे साम्राज्य पसरलेले निदर्शनास येत आहे

सिडको आणि एमआयडीसी भागातही मोकळ्या भूखंडांवर इतर ठिकाणी कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात. नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांची देखील स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. एकंदरीत इतर शासकीय यंत्रणांचा निरुत्साह कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण हा केंद्र शासनाचा उपक्रम असून महापालिकासह सर्वच शासकीय यंत्रणांवर याची जबाबदारी आहे. शहरातील स्वच्छतेचा संपूर्ण भार एकट्या नवी मुंबई महानगरपालिकेला वहावा लागत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात या यंत्रणांनी जर सहभाग घेतला तर शहराचे नामांकन नक्कीच उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई महापालिका इतिहासात प्रथमच होणाऱ्या लिडार सर्वेक्षणाला आणखी मुदतवाढ मिळणार

नवी मुंबईतील शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी शहरातील सिडको, एमआयडीसी ,महावितरण, एपीएमसी अशा विविध प्राधिकरणा समवेत बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या अख्त्यारित असलेल्या जागेत स्वच्छता ठेवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे, असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर म्हणाले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 21:32 IST
Next Story
नवी मुंबई महापालिका इतिहासात प्रथमच होणाऱ्या लिडार सर्वेक्षणाला आणखी मुदतवाढ मिळणार