मुंबई : गेल्या काही दिवसांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत बांधकामांचे सर्वेक्षण करीत आहे. हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले असून आठवड्याभरात हे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यानुसार पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या १६८४ रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण करून पुढील आठवड्यात त्यांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात रमाबाई आंबेडकर नगर येथील १६८४ झोपड्या विस्थापित होणार आहेत. केवळ या १६८४ झोपड्यांचेच पुनर्वसन न करता संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचे पुनर्वसन करण्याचा निर्णय एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरणाने घेतला आहे. संयुक्तिक भागिदारी पद्धतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरणामध्ये यासंदर्भात करार झाला असून त्यानुसार झोपु प्राधिकरणाने १६,७५७ बांधकामाचे सर्वेक्षण आणि रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्या कामास मार्चमध्ये सुरुवात केली. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात सर्वेक्षण पूर्ण होईल, अशी माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे कामही सुरू आहे. विस्तारीकरणात विस्थापित होणाऱ्या रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता आठवड्याभरात या १६८४ जणांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
रमाबाई आंबेडकर नगरातील १६८४ जणांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यावर सूचना-हरकती मागविण्यात येतील. या सूचना-हरकतींचा विचार करून या रहिवाशांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उर्वरित रहिवाशांची जसजशी पात्रता निश्चिती पूर्ण होईल, तसतशी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि पुढील कार्यवाही पूर्ण करून परिशिष्ट २ प्रसिद्ध केले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास घरे रिकामी करण्यात येणार असून घरांच्या पाडकामाअंती मोकळी होणारी जमीन एमएमआरडीएला दिली जाणार आहे. त्यानंतर एमएमआरडीएकडून पुनर्वसित इमारतीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर एमएमआरडीए निविदा खुल्या करून त्या अंतिम करणार आहे. एकूणच आता शक्य तितक्या लवकर पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.