नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत घसरण झाली असून शहराची हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली आहे. कमी झालेला वाऱ्याचा वेग आणि आर्द्रतेमुळे प्रदूषके हवेत साचून राहिल्याने वातावरण अधिक दूषित होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. त्यातच बांधकाम प्रकल्पांमधून उडणारी धूळ, औद्योगिक क्षेत्रातून उत्सर्जित होणारा रासायनिक धूर आणि फटाक्यांचा धूर मिळून पुढील काही दिवसांत हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ॲपनुसार सोमवार २० ऑक्टोबर रोजी नवी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १९२ इतका नोंदला गेला. नेरुळ येथे हवा निर्देशांक सर्वाधिक म्हणजे २४६, त्याशिवाय महापे येथे १०५, कळंबोली १९३ तर तळोजा येथे २२२ इतका हा निर्देशांक होता. हे सर्व आकडे ‘मध्यम’ ते ‘वाईट’ श्रेणीत मोडणारे आहेत. यापूर्वी शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी शहरातील हवेची गुणवत्ता पातळी ६४ म्हणजे समाधानकारक श्रेणीत होती. मात्र, शनिवारपासून हवेची गुणवत्ता पातळी अनुक्रमे ११० आणि रविवारी १६७ इतकी नोंदवली गेली. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता पातळी दिवसेंदिवस ढासळत असल्याचे दिसून आले आहे. यावरून औद्योगिक वसाहतीतून उत्सर्जित होणारा रासायनिक धूर आणि बांधकामाधीन परिसरांमधून उडणाऱ्या धुळीचा व वाहनांच्या धुराचा नवी मुंबईच्या वातावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट होते. त्यातच दिवाळीनिमित्त फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या धुरानेही भर घातली आहे.

धुरक्याचे प्रमाण अधिक

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस शहरात कोरडे वातावरण राहील, असे संकेत दिले आहेत. त्यातच शहराचा पारादेखील चढत असून येत्या काही दिवसांत शहराचे कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्यानंतर वाऱ्यांची दिशा बदलल्याने आणि वेग मंदावल्यानं हवेत साचलेले कण सहजपणे खाली बसत नाहीत. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ धुरक्याचे प्रमाण अधिक जाणवत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

नागरिकांना आवाहन

प्रदूषणामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे आजार वाढू शकतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी बाहेर जाणे टाळावे. घरातील खिडक्या शक्यतो बंद ठेवाव्यात. लहान मुले, वयोवृद्ध आणि दमा किंवा ॲलर्जीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रशासन सतर्क

दिवाळी काळात शहरातील धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून दिघा ते बेलापूर या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. यात घनकचरा विभागाच्या माध्यमातून दिवसातून दोन सत्रांत सर्व यंत्रणा राबवून शहरातील धूळ नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

लक्ष्मीपूजनादिवशी फटाक्यांद्वारे प्रदूषण होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, शहरातील वायुप्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक यंत्रणा आपल्याला नेमून दिलेले काम योग्य रीतीने पार पाडत आहे. सतीश पडवळ, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई