पनवेल : कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरात १५ लाखांच्या अमलीपदार्थाच्या विक्री प्रकरणात पोलिसांना नवे तपशील समोर आले आहेत. संशयित आरोपी राजन राठोड गेल्या दोन महिन्यांपासून दररोज मुंबईहून स्कुटीवरून स्टील मार्केट परिसरात येत होता आणि मंतोष ढाब्याजवळ हेरॉईनची कागदी पुड्यांमधून तो विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
ढाब्याशेजारी खुर्ची घेऊन बसलेला राठोड हा ग्राहकांना ओळखीचा इशारा देऊन स्कुटीच्या डिकीतून लहान पुड्यांमध्ये हेरॉईन विकत होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. परंतू गेल्या दोन महिन्यांपासून राजनचा काळाबाजार कळंबोली पोलीस आणि लोखंड पोलाद बाजार समितीच्या निदर्शनास का आला नाही असा प्रश्न व्यापारी वर्गाकडून विचारला जात आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने तीन दिवसांपूर्वी सोमवारी दुपारी केलेल्या कारवाईत राजन राठोड याच्याकडून तब्बल १५ लाख २९ हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यामध्ये ३० ग्रॅम हेरॉईन आणि जवळपास दोन किलो गांजा होता.
विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५७ कागदी चिठ्ठ्या, ५० हजार रुपये किंमतीची सुझुकी बर्गमॅन स्कुटी आणि एक मोबाईल फोनही पोलिसांनी हस्तगत केला आहे. राजन राठोड हा मानखुर्द येथील आण्णाभाऊ साठे नगरमधील रहिवासी असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध नवी मुंबईचे पोलीस घेत आहेत. नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईमुळे स्टीलमार्केटमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासूनचा हा गैरधंदा उजेडात आला.
स्टीलमार्केटच्या मुख्य रस्त्यावर अमली पदार्थाचा काळाबाजार मंतोष ढाब्याशेजारी राजरोस सुरू होता. मात्र हा अतिक्रमन करून बांधण्यात आलेल्या मंतोष ढाब्याला कोणाचा आशिर्वाद होता असा सवाल येथील व्यापारीवर्गातून विचारला जात आहे. अतिक्रमन असूनही या ढाब्यावर लोखंड पोलाद बाजार समितीच्या अतिक्रमन विभागाने कारवाई केली नव्हती. मुख्य रस्त्यावर हा अमलीपदार्थाचा काळाबाजार सुरू असताना येथील गस्त घालणा-या पोलिसांना तो दिसला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी “नशामुक्त नवी मुंबई” अभियान सुरू केले. वारंवार जनजागृती काढून रहिवाशांमध्ये अमलीपदार्थ सेवन करणा-यांमध्ये जागृती आणली जात आहे. नवी मुंबईतील अमली पदार्थ तस्करीमधील आरोपींना सूरक्षा देणा-या पोलीस कर्मचा-यांना सुद्धा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी यापूर्वी कठोर शासन केले आहे. कळंबोली येथे १५ लाख २९ हजारांचा अमली पदार्थाची विक्री करणा-याला अटक रंगेहाथ पकडल्यानंतर या तस्कराला अभय देणारे कोण आणि त्या अभय देणा-यांवर पोलीस आयुक्त भारंबे कोणती कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष्य लागले आहे.