नवी मुंबई: मोटार वाहन कायदा अधिक कठोर केल्याने ट्रक चालकानीं तीन दिवस संप पुकारला आहे. त्याचे परिणाम दिसू लागले असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पर राज्यातील आवक घटली आहे. संप असाच राहिला तर निश्चित भाज्यांचे दर कडाडतील अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करीत कायदे कठोर केले. त्यात खास करून अपघात ग्रस्ताला मदत न केल्यास ७ वर्षांची शिक्षा आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या विरोधात ट्रक चालकांनी  सोमवार पासून  देशभरातील तीन दिवसाचा संप पुकारला आहे. याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर पडला असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत पर राज्यातून विशेषतः गुजरात, राजस्थान मध्यप्रदेश कर्नाटक येथून येणारा माल आला नाही. त्यामुळे पर राज्यातून येणारे गाजर, वाटाणा , फुल कोबी, पत्ता कोबी , फरसबी या भाज्यांची आवक झाली नाही. कांदा बटाटा मध्ये बटाटा आवक नियमित आहे.

हेही वाचा… तीन हजार कोटींचे प्रकल्प वाचविण्यासाठी ‘रडार’चे स्थलांतर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र कांद्याची आवक घटली  असून रोज १०० ते १२० गाड्या येतात मात्र आज केवळ ७० गाड्यांची आवक झाली. विशेष म्हणजे राज्यातील भाज्यांची आवक नियमित आहे मात्र राज्यातील विविध ठिकाणाहून येणार्या कांद्याची आवक घटली आहे. अशी माहिती कांदा बटाटा व्यापारी अशोक वाळुंज यांनी दिली . रोज भाज्यांच्या  ६५० ते ७०० गाड्यांची आवक नियमित होते मात्र आज ५५० ते ५७५ च्या आसपास गाड्या आल्या आहेत.  अशी माहिती भाजी व्यापारी रामदास पवळे यांनी दिली. त्यामुळे  सरकारच्या माध्यमातून संपावर तोडगा काढून जर उद्या पर्यंत चालकांचा संप मिटला नाही,तर आवक आणखी खाली येऊन भाजी पाल्यांचे दर दुपटीने वाढतील,त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संप मिटावे अशी पावले उचलावीत असा सूर व्यापारी वर्गात उमटला आहे.