उरण: गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून सध्याच्या डिजिटलच्या काळातही रंगविलेल्या पारंपरिक कापडी पडद्याच्या मखरांची मागणी कायम आहे. थर्माकोल ला बंदी असल्याने पर्याय म्हणून कागदी फुले, विविध प्रकारच्या दिव्यांची सजावट तसेच नैसर्गिक झाडे, फुले व पाने यांचीही आरास केली जात आहे. मात्र हे पर्याय उपलब्ध असतांनाही उरण मधील पेंटर, कारागीराकडून रंगविलेल्या कापडी आकर्षक, टिकाऊ व नैसर्गिक मखरांना मागणी ही असल्याचे कारागीरांचे म्हणणे आहे. घरगूती गणेशोत्सवाच्या मखर सजावटीसाठी अनेक गावात आजही एक स्वतंत्र अशी गणपतीची खोली अस्तित्वात आहे. या खोलीत छतासह तिन्ही दिशांना पडदे लावून मखर सजविले जात होते. हेही वाचा. पनवेल – उरण व्हाया बोकडवीरा एसटी सेवा अखेर दोन वर्षानंतर सुरु मात्र डिजिटल चे युग सुरू झाल्याने रंगविलेले पडदे आणि त्यांचे मखर कालबाह्य ठरू लागले आहेत. डिजिटल पडद्या बरोबरीने सध्या डिजिटल स्क्रीनच्या ही मखरांची सजावट केली जात आहे. उरण मधील ग्रामीण भागातील अनेक गावात अशाप्रकारच्या कापडी पडद्याचे मखर करण्यासाठी पेंटर कडून ऑर्डर देऊन हे पडदे तयार केले जात आहेत. यामध्ये निसर्ग चित्र,राजवाड्याचे देखावे आदी तयार करून घेतले जात असून कापड आणि रंगाचे दर वाढले असले तरी परंपरा म्हणून अनेक गणेशभक्तांच्या मागणी नुसार मखरासाठी पडदे तयार करीत असल्याची माहिती उरण मधील पेंटर सुभाष जोशी यांनी दिली आहे.