नवी मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर व वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना केलेल्या दूरध्वनीनंतरही ठेकेदाराने मनमानी करत लोटस तलावात १०० ट्रक भराव टाकण्याचे काम केले होते. त्यामुळे सिडकोच्या पर्यावरण नष्ट करण्याच्या कृती विरोधात व लोटस तलाव वाचवण्यासाठी सलग दुसऱ्या रविवारी (ता.१५) विविध पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटना,नागरीक, लोकप्रतिनिधी यांनी सकाळी ७ वाजता एकत्र येत लोटस तलाव वाचवण्याचा निर्धार केला.

‘पर्यावरण टिकवा ,लोटस लेक वाचवा’ अशा घोषणा देत रस्त्यावरील व कायदेशीर लढाई अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार मोठ्या प्रमाणात उपस्थित पर्यावरण प्रेमींनी केला. यावेळी नवी मुंबईतील वाशी ,खारघर बेलापूर ,नेरूळ , सीवूड्स अशा विविध विभागातून पर्यावरण प्रेमी व नागरिक उपस्थित होते. सिडकोचा लोटस तलाव बुजवून पर्यावरणाची हानी करत टोलेजंग इमारती उभारण्याचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार असला तरी अखेरपर्यंत लढा देऊन लोटस तलाव वाचवणारच असा निश्चय करण्यात आला.

आज रविवारी सकाळी ७ वाजता सेव्ह नवी मुंबई एन्हवायरमेंट,मॅंग्रोज सोल्जर,सजग नागरीक मंच, सेव्ह लोटस लेक, सीवूड्स दारावे मित्र मंडळ, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, वकील यांच्यासह विविध पर्यावरणप्रेमी लोटस तलाव वाचवण्यासाठी व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी सीवूड्स सेक्टर २७ येथील लोटस लेक येथे एकत्र आले होते.

सिडकोने मुजोरी करत पर्यावरणाची हानी करत लोटस तलाव नष्ट करण्याचा घाट घातला असून नवी मुंबईतील विमानतळाच्या कामातील रायगड जिल्ह्यातील भराव नेरुळ सेक्टर २७ येथील लोटस तलावात टाकण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी , लोकप्रतिनिधी व पालिकेच्या सहकार्याने सध्या तलावात भर टाकण्याचे काम थांबले असले तरी पर्यावरण प्रेमींनी तलावात टाकलेला भराव काढून घ्यावा याची मागणी केलीआहे.

सध्या तलावातील भराव टाकण्याचे काम थांबवले असले तरी लोटस तलाव बुजवण्याचा सिडकोचा इरादा आहे. लोटस तलाव हा पाणथळ तलाव म्हणून उल्लेखित असतानाही सिडको शहरातील निसर्ग संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा राग पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. सिडको सहव्यवस्थापकीय संचालक यांना लोटस तलाव बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असून टीआयपीएल कंपनीने जवळजवळ १०० डंपर भराव तलावात टाकले असून तो भराव सिडकोने परत काढून घ्यावा अशी मागणी केली आहे. लोटस तलाव पाणथळ तलाव असताना सिडकोने मनमानी करत भराव टाकला आहे. त्यामुळे आज रविवारी (ता .१५) सकाळी ७ वाजता सिडको विरोधात आंदोलन करण्यात आले.

सिडको मनमानी करत असून नवी मुंबई शहरातील नैसर्गिक सौंदर्य संपवण्याचा प्रयत्न सिडकोचा आहे. त्यामुळे एकजुटीने सिडको विरोधात कायदेशीर व रस्त्यावरील लढाई लढण्याचा पर्यावरण प्रेमींचा निर्धार कायम आहे.

तरीन मिथेल, पर्यावरण प्रेमी खारघर

सीवूड्स मधील लोटस तलाव वाचवण्यासाठी नवी मुंबईतील विविध विभागातून पर्यावरण प्रेमी एकत्र आले होते. त्यामुळे लोटस त्याला वाचवण्याचा लढा हा यापुढील काळात अधिक तीव्र होणार आहे. लोटस त्याला वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी स्वतःहून पुढे येऊ लागले आहेत ही आनंदाची बाब आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रुती अग्रवाल, सेव, नवी मुंबई एन्व्हायरमेंट