नवी मुंबई : नवी मुंबई शहराला विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे येथून जलवाहतूकीचा पर्याय ही उपलब्ध होऊ शकतो. या अनुषंगाने बेलापूर ते मुंबई असा जलप्रवास करण्याचे नियोजन आखण्यात आले असून येत्या मंगळवार दि. ७ फेब्रुवारीपासून बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ही मदत होणार आहे.

दिवसेंदिवस खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी रस्ते मार्गाने प्रवास करताना विशेषतः मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्याचबरोबर भरमसाठ वाहनांमुळे वायू प्रदूषणात ही भर पडत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून नागरिकांचा प्रवास सुकर आणि प्रदूषण कसे कमी करता येईल यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर विद्युत बसचा पर्याय उपलब्ध केला आहे . शिवाय आता जलवाहतुकी कडेही भर दिला जात आहे. 

हेही वाचा >>> नवी मुंबई : देशातील पहिले स्मार्ट व्हिलेज दिवाळे गाव आता सौर ऊर्जेने उजळून निघणार

याअनुषंगाने नवी मुंबईतून  जलवाहतूक प्रवास सुरू करण्यात येत असून बेलापूर- मुंबईचा प्रवास अवघ्या तीस मिनिटात पार करता येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून बेलापुर मध्ये जेट्टी बांधून वॉटर टॅक्सी’ सेवा मागील वर्षी सुरू करण्यात आली होती. मात्र अधिक भाडे असल्याने या  सेवेकडे नागरीकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे याचे भाडे कमी करावे म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अधिवेशनात मागणी केली होती.आणि.त्यांच्या मागणीला  यश आले असून आता कमी भाडे आकारून ही सेवा सुरू होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टप्प्याटप्प्यात नवी मुंबईहून मुंबई, जेएनपीटी, एलिफंटा, रेवस या ठिकाणी जाण्यासाठी वॉटर टॅक्सी’चा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्राथमिक स्वरूपात बेलापूर ते मुंबई असा प्रवास सुरू करण्यात येत आहे. ही वॉटर टॅक्सी १४ ते ५० आसनी क्षमतेची असून याकरिता प्रवाशांना २५०-३५०रुपये मोजावे  लागणार आहेत. या सुरू होणाऱ्या वॉटर टॅक्सीला नवी मुंबईकर किती पसंती देतात हे पुढील कालावधीतच स्पष्ट होईल.