विकास महाडिक
महामुंबई क्षेत्रातील बेलापूर ते पेन्धर या अकरा किलोमीटर लांबीच्या पहिल्या मेट्रो रेल्वे मार्ग प्रकल्पातही दिरंगाई सुरू आहे. कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे झालेली दिरंगाई आणि त्यामुळे मोठा खर्च वाढला आहे. याला आवर घालण्यासाठी उर्वरित चार मार्गाचे काम हे केंद्र व राज्य सरकारच्या बांधकाम कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव सिडको प्रशासन तयार करीत आहे.
पहिल्या प्रकल्पातील कंत्राटदारांचे एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. नऊ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा शुभांरभ झाला तर गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पातील मार्गाची तळोजा येथे यशस्वी चाचणी पार पाडली होती, पण अनेक कामे अपूर्ण असल्याने या मार्गावर अद्याप मेट्रो धावलेली नाही.
नागरीकरणामुळे महामुंबई क्षेत्राची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर होत असून हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे या मार्गावर एलिव्हेटेड रेल्वेचा पर्याय शोधण्यात आला असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. सिडकोची महागृहनिर्मिती तसेच नैना क्षेत्राच्या विकासामुळे महामुंबईत राहण्याची पसंती देणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या भागात मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारित करण्याचा प्रस्ताव सिडकोने दहा वर्षांपूर्वीच तयार केला असून बेलापूर पेन्धर, खांदेश्वर तळोजा, पेन्धर ते तळोजा, आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ असे चार मार्ग नियोजित केले आहेत. याशिवाय हाच मेट्रो मार्ग पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार आहे. सिडकोच्या बेलापूर ते पेन्धर या ११ किलोमीटर लांबीच्या पहिल्याच मेट्रो मार्गाला गेली नऊ वर्षे सतराशे साठ विघ्ने निर्माण होत आहेत. त्यामुळे पहिल्या चार वर्षांत सुरू होणारी मेट्रो गेली नऊ वर्षे रखडली आहे. आणखी किती काळ जाईल याची खात्री देता येत नाही असे चित्र आहे. साडेचार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्पातील व्हायडक्ट, स्थानके, आगार अशी कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र सिग्नलिंगची कामे अद्याप कागदावरच आहेत. मध्यंतरी व्हायडक्टच्या कामातील कंत्राटदाराबरोबर वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण मुबंई उच्च न्यायालयात गेले होते. सिडकोने आपली बाजू मांडल्यानंतर हे काम दोन कंत्राटदारांना विभागून देण्यात आले. तरीही या कामात म्हणावी तशी गती आलेली नाही. चार वर्षांचा प्रकल्प नऊ वर्षे झाली तरी सुरू न झाल्याने या प्रकल्पावर सिडकोचे कोटय़वधी रुपये अतिरिक्त खर्च होत आहेत. या प्रकल्पासाठी सिडकोने चीनमधून (करोना साथ रोगापूर्वी) डबेदेखील आयात केले असून त्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. हा प्रकल्प दिवसेंदिवस पांढरा हत्ती होत चालला असल्याने यानंतरच्या तीन प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या बांधकाम कंपन्यांना हे काम देण्याचा प्रशासन प्रस्ताव तयार करीत आहे. दिल्लीतील मेट्रोचे काम हे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने केले आहे. नवी मुंबई मेट्रोसाठी ही कंपनी सल्लागार म्हणून काम करीत आहे. सध्या सुरू असलेल्या कामात प्रगती होऊनहा प्रकल्प पुढच्या वर्षी किमान सुरू व्हावा यासाठी सिडको प्रयत्नशील आहे.