नवी मुंबई – तुर्भे इंदिरानगर येथील ज्योती डाई केम प्रा.लि कंपनी प्लाट नं. डी ७६ /१ या कंपनीत गॅस गळती झाल्याने या परिसरातील नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे तुर्भे नगर येथील महेश कोठीवाले यांनी तात्काळ जाऊन कंपनीची पाहणी केली असता त्या ठिकाणी अमोनिया वायू कंपनीच्या गटारामध्ये सोडत असल्याचे निदर्शनास आले.
कंपनीमध्ये अनेक बॅरल उघड्यावर भरून ठेवण्यात आल्याचे दिसून आल्याने याबाबत तेथील कामगारास जाब विचारला असता कंपनी मालकाने सांगितल्याप्रमाणे कंपनीजवळील नाल्यात हा गॅस सोडण्यात येत होता. परिसरात गॅसच्या वासामुळे नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. याबाबत अधिक माहिती घेऊन संबंधित कंपनीविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश कोठीवाले यांनी लोकसत्ताला दिली.