उरण : जेएनपीएच्या अध्यक्षपदी २००४ च्या उत्तर प्रदेश बॅचचे आयएएस अधिकारी गौरव दयाळ यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. शनिवारी ११ ऑक्टोबरला त्यांची बंदर जहाज आणि जलवाहतूक मंत्रालया अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती पुढील पाच वर्षाकरीता करण्यात आली आहे. संजय सेठी यांच्या नंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दीड दोन वर्षांपासून हे पद रिक्त होत. त्याऐवजी उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सध्या जेएनपीए कडून विविध प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यात बंदरावर आधारित सेझ,हरित बंदराचे स्वप्न साकार करण्यासाठी ई वाहने,बंदर आणि परिसराचे सुशोभीकरण, मुंबई दिल्ली रेल्वे माल वाहतूक कॉरिडॉर, बंदराच्या कामगार वसाहतीतील सीबीएससी विद्यालयाची उभारणी आदी कामे सुरू करण्यात आली आहेत. बंदरात नव्याने सिंगापूरचे बी एम सी टी या बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले आहे.

 त्यामुळे बंदरातील कंटेनर हाताळणीची क्षमता ७३ लाखांवरून १ कोटीवर पोहचणार आहे. या भरारी मुळे जेएनपीए बंदर हे जगातील ९६ व्या क्रमांकावरून २३ व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर कंटेनर हाताळणीत जेएनपीए देशातील प्रथम क्रमांकाचे बंदर बनले आहे. बंदराच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू आहेत. मात्र गेल्या ४० वर्षांपासून शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र कायम आहे.