पालिका प्रशासन, रुग्णालय यांच्यातील समन्वय अभाव सर्वसामान्यांना फटका; खासगी रुग्णालयांत प्रतीक्षा यादीत वाढ

विकास महाडिक/संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे दरवाजे बंद असल्याचे भयावह चित्र सध्या नवी मुंबईत आहे. पालिका रुग्णालयांमधील खाटा कागदावरच पुरेशा आहेत. मात्र, प्रत्यक्षात रुग्णांना रुग्णालयांच्या दरवाजातूनच परत पाठवले जात आहे. हीच दशा खासगी रुग्णालयाचीही झाली आहे. अनेक रुग्णांना प्रतीक्षा यादी मोठी असल्याचे सांगून दाखल करून घेण्यास व्यवस्थापन नकार देत आहे. नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा दहा हजारचा टप्पा कधीही गाठू शकतो, अशी स्थिती असताना पालिका अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. रुग्णालयाचा क्रमांक आणि संबंधित समन्वय अधिकाऱ्याचा क्रमांक नागरिकांपर्यंत दिला न  गेल्याने नागरिकांसमोर कोणाला संपर्क करायचा हा प्रश्न निर्माण होतो. यात सर्वसामान्यांची मोठी फरफट होत आहे.

खासगी रुग्णालयातही करोना रुग्णांना प्रतीक्षा यादीत ठेवले जात आहे. वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला लागण झाल्यानंतर वाशीतील ‘फोर्टिस’ रुग्णालयात नातेवाईकांनी संपर्क साधला. त्या वेळी त्यांना ५० रुग्ण प्रतीक्षा यादीत असल्याचे सांगण्यात आले. एमजीएम रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार केले जात नाहीत. पालिकेने शहरातील बडय़ा खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून एक हजार खाटा राखीव ठेवल्या आहेत, तर शहरात ३ हजार ४९५ रुग्ण उपचार घेत आहेत.

पालिका रुग्णालयातील स्थिती याहून वेगळी आहे. पालिका यंत्रणेतील समन्वयाच्या अभावामुळे आरोग्ययंत्रणा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती बाधित झाल्यानंतर तातडीने रुग्णालयाचा शोध सुरू केला जातो. ज्या वेळी रुग्णाला घेऊन कुटुंबीय जातात तेव्हा वैद्यकीय अधिकारी खाटा उपलब्ध नसल्याचे कारण देऊन रुग्णाला अन्य पर्याय सूचविला जातो. त्यामुळे रुग्णालयाच्या दारातूनच माघारी वळावे लागते आणि अन्य रुग्णालयाचा शोध घ्यावा लागतो.

वाशी येथील एमजीएम रुग्णालयात इतर आजारांचा उपचार घेणाऱ्या एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला  लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या नातेवाईकांनी फोर्टिस, रिलायन्स आणि अपोलो रुग्णालयांत संपर्क साधल्यानंतरही खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. वाशी येथील एमजीएम रुग्णालयात कोविड कक्ष नाही. या रुग्णालयाने पहिल्यापासून आडमुठी भूमिका घेतली होती. साथरोग नियंत्रण कायद्याची या रुग्णालयाला जाणीव करून देण्यात आली आहे.

दोन हजार खाटा

* नवी मुंबई पालिका क्षेत्रात करोना रुग्णांसाठी तीन प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यात काळजी केंद्र, करोना उपचार केंद्र आणि समर्पित रुग्णालयाची उभारणी करण्यात आलीआहे. यात आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल केले जाते. पालिका रुग्णालयांतील खाटांची संख्या कागदावर चांगली असते. परंतु, प्रत्यक्षात रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

* शहरात रुग्णाला दाखल करण्यापूर्वी लाखो रुपयांची अनामत रक्कमही मागितली जात असल्याच्या तRारी आमदार तसेच विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांनीही पालिकेकडे केल्या आहेत. त्यामुळे याबाबत पालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेण्याची आवश्यकता आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार शहरात अद्याप दोन हजारांहून अधिक खाटा उपलब्ध असताना नागरीकांना मात्र खाटांविना विविध ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.

राज्यमंत्र्यांसमोरच पितळ उघडे

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच पालिका मुख्यालय तसेच करोना रुग्णालयाला भेट दिली. याबाबत मंत्र्यांनी खाटांच्या उपलब्धतेविषयी नागरिकांची नाराजी असल्याचे सांगितले. यावर नेरुळमधील एका रुग्णालयात दूरध्वनी केला असता खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी ५ नंतर त्या उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. मात्र, पालिका अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी खाटा उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे पालिका आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्यात समन्वय नसल्याची गोष्ट मंत्र्यांसमोर उघड झाली.

‘शेवटी मुंबई गाठली’

शहरात करोनाबाबत नागरीकांमध्ये भिती आहे.माझ्या मित्राच्या आईला करोना झाल्याने नेरुळमधील दोन तीन रुग्णालयात विचारणा केली असता खाट शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. शेवटी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात घेऊन गेलो. त्यामुळे पालिकेने याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सुनील मुळीक यांनी सांगितले.