उरण : कापणीला आलेल्या पिकांवर पावसामुळे परिणाम झाला असून अनेक पिके पावसामुळे कुजली आहेत. तर दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याने उरलेल्या पिकांवर ही संकटाची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे. पावसात शेतकऱ्यांचे सोन्यासारखे भातपीक मातिमोल झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, पावसाने शेतकऱ्यांना रडविले आहे. त्यामुळे भात पिकांचे सरसकट पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील मोठीजुई, कळंबुसरे, चिरनेर, वशेणी, खोपटे, सारडे, धाकटीजुई, केगाव, नागाव या भागातील अनेक गावातील भातखाचरात पाणीच पाणी झाले असून, भाताची पिके आडवी होऊन पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. यात खाडी विभागातील शेती अक्षरशा पाण्याखाली आली आहे. भातशेतीत गुडघाभर चिखल असून, अशा चिखलात जाऊन शेतकरी भातपिके वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या भागात कापणीला आलेली भातपिके चिखलात अडकल्याने त्याला कोंब आले आहेत. त्यामुळे भातपिके कुजून जाण्याची शक्यता आहे.
अशी माहिती येथील शेतकरी गोपाळ केणी यांनी दिली. अशा परिस्थितीमुळे वर्षभर लागणारे भाताचे धान्य उपलब्ध होणार नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बाजारातील धान्य विकत घेणे परवडणार नाही. त्यामुळे महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.