नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे वडाळा, चुनाभट्टी आणि कुर्ला स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वडाळ्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी गाडी वडाळा स्थानकातच थांबवण्यात आली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ही गाडी वडाळा स्थानकात उभी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अचानक गाड्या थांबल्याने काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत घरी जाण्याचा मार्ग धरला आहे.

कुर्ला स्थानकावरील घोषणेनुसार सकाळी ११.१५ वाजल्यापासून मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. वाशी स्थानकात पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी गाडी थांबवण्यात आली असून, प्रवाशांना गाडीतून उतरवण्यात आले आहे. बेलापूर स्थानकातही पनवेलकडून सीएसएमटीकडे जाणारी सेवा थांबली आहे. तर, पनवेल–ठाणे मार्गावरील गाड्या मात्र २०-३० मिनिटे उशिराने धावत असून, ही सेवाही संथगतीने सुरू आहे.

याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महापालिकेची पाणी निचरा करणारी पाईपलाईन बंद असल्याने रेल्वे रुळांवरील पाणी ओसरण्यास विलंब होत आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे प्रशासन सज्ज असून सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नोकरीसाठी निघालेल्या अनेकांना गाड्या थांबल्याने वेळेवर पोहोचणे शक्य झालेले नाही. काही ठिकाणी प्रवाशांनी गर्दीमुळे रेल्वे गाड्यांतून उतरून रुळांवरून चालत जाण्याचा निर्णय घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली असली, तरी खासगी कार्यालये उघडीच ठेवण्यात आल्याने प्रवाशांचा मनस्ताप आणखी वाढला आहे.पावसाचा जोर कायम राहिल्याने आणि पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक पूर्ववत होणे शक्य नसल्याने रेल्वे प्रवास अनिश्चितकाळासाठी विस्कळीत होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.