नवी मुंबई : गेल्या ४८ तासांपासून मुंबई व उपनगरांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवांवर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. हार्बर रेल्वे गाड्या सरासरी १० ते १५ मिनिटे तर ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. काही रेल्वे स्थानकांत रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली असली, तरी परिस्थिती अद्याप नियंत्रणात असून गाड्या संथ गतीने का होईना,पण सुरु आहेत.
काल झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने काही शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली. तर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होमचा’ पर्याय दिला आहे. त्यामुळे साधारणपणे सोमवारी सकाळी दिसणारी गजबज रेल्वे स्थानकांत आज कमी प्रमाणात दिसत आहे. तरीही पावसामुळे होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांना थांबून प्रतीक्षा करावी लागत आहे.
रेल्वे स्थानकांत सकाळपासूनच काही प्रमाणात पाणी साचलेले दिसले. विशेषतः कुर्ला, सायन, चेंबूर, वाशी, नेरुळ, ठाणे, ऐरोली आदी भागातील स्थानकांवर पाण्याचा साठा होत असल्याने गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाड्या मंदावून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या ‘रेड अलर्ट’ च्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांसाठी ‘सुरक्षा संकेत’ जारी केले आहेत. पावसाळ्यात प्रवास करताना प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. फूटबोर्डवर उभे राहून प्रवास न करणे, रुळांवर पाणी साचल्यास रुळ ओलांडू नये, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे तसेच संयम ठेवावा अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे नाल्यांत साचणारा प्लास्टिक व कचरा. त्यामुळे पाणी निचऱ्याला अडथळा निर्माण होतो. यामुळे पाणी झपाट्याने रेल्वे मार्गावर साचते आणि वाहतुकीवर परिणाम होतो. याबाबतही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना व नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे प्रशासनाचे निर्देश
सुरक्षित प्रवासासाठी सतर्कता बाळगा.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा.
संयम ठेवा; प्रशिक्षित कर्मचारी मदतीसाठी तत्पर आहेत.
पावसाळ्यात फूटबोर्डवर उभे राहून प्रवास टाळा.
पाणी साचलेल्या परिस्थितीत रुळ ओलांडू नका.
प्लास्टिक किंवा कचरा रुळांवर टाकू नका; नाले बंद होऊन पाणी साचण्याची समस्या वाढते.