नवी मुंबई : सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा अधिकच घट्ट होत असून प्रवासी आणि स्थानिक व्यापारी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पादचारी मार्ग व्यापून फेरीवाले बसल्याने रेल्वे स्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे सुनियोजित शहरातील रेल्वे स्थानकांवर नागरिकांकडून ताशेरे ओढले जात आहेत.

सीबीडी-बेलापूर या परिसरात अनेक लहान-मोठी कार्यालये आणि सिडको मुख्यालय असल्याने हे स्थानक नेहमीच प्रवाशांनी गाजबजलेले असते. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानकातच आपले लहान व्यवसाय सुरू केले आहेत. फेरीवाल्यांच्या अस्ताव्यस्तपणामुळे रेल्वे स्थानकाचे सौंदर्यही नाहीसे होत आहे. स्थानकाबाहेरील रस्ते व फुटपाथ यावर सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी फेरीवाल्यांचा ताबा असतो. प्रवाशांना त्यातून वाट काढताना अडथळे निर्माण होतात. शिवाय काही विक्रेत्यांकडून उघड्यावर स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याने अपघाताची भीती प्रवाशांनी वर्तवली आहे.

त्याचबरोबर रेल्वे स्थानकातील अधिकृत दुकानदारांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. फेरीवाल्यांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे स्थानक परिसरात कचऱ्याचा प्रश्नही वाढला असून परिसर अस्वच्छ व असुरक्षित झाला आहे, अशी तक्रार काही व्यावसायिकांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची जबाबदारी सिडकोकडे असल्याने, “संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन, योग्यती कारवाई करण्यात येईल.” अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे.

  • नागरिक संघटनांनी सिडको, नवी मुंबई महानगरपालिका व स्थानिक पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. काही काळ कारवाई होत असली तरी काही दिवसांतच फेरीवाले पुन्हा ठाण मांडून बसतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
  • यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने ‘डेली बाजार’सारख्या नियोजित पर्यायांद्वारे फेरीवाल्यांना पुनर्वसनाची योजना मांडली होती. परंतु ती पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय घेण्याची मागणी नागरिक व प्रवासी संघटनांकडून होत आहे.
  • परिसरात नियमित गस्त व स्वच्छता मोहीम राबविण्यात याव्यात, फेरीवाल्यांना तातडीने रेल्वे स्थानक परिसरातून बाजारपेठांमध्ये त्यांची रवानगी करण्यात यावी, तसेच फुटपाथ व पादचारी मार्ग मोकळे ठेवण्यात यावेत. अशा प्रमुख मागण्या प्रवाशांकडून केल्या जात आहेत.