नवी मुंबई : मला केवळ आश्वासन देऊन भाषण करून पळून जाता येत नाही. मला पुढील वर्षी येथेच यायचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माथाडी नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंती निमित्त आयोजित माथाडी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगार कायदा , मराठा आरक्षणाबाबत त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. माथाडी कायद्यात बदल अत्यावश्यक असल्याचे ठाम मत त्यांनी मांडले. राज्यातील अनेक उद्योग माथाडी कायद्यांमुळे शेजारील राज्यात जात आहे. त्यामुळे उद्योग राज्यात आणण्यासाठी टिकवण्यासाठी मूळ गाभ्याला हात न लावता त्यात अत्यावश्यक बदल आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कामगार विभागाने काही बदल सुचवले मात्र माथाडी नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनी त्यातील त्रुटी समोर आल्यावर बदल तात्काळ थांबवले. मात्र माथाडी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई केली तरी पळवाटा शोधून ते सुटतात. त्यामुळे पन्नास वर्षे जुन्या कायद्यात बदल आवश्यक आहेत. या कायद्याचा गैरवापर वाढल्याने नव्या कंपन्या शेजारील राज्यात जात आहे. त्यामुळे भावनिक न होता बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे रोखठोक मत फडणवीस यांनी मांडले. मात्र हे करत असताना माथाडी कायद्याच्या गाभ्याला हात लावणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे माथाडी नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून बदल केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय नवी मुंबईत मागण्यात आलेली जागा, नाशिक लेव्ही प्रलंबित प्रश्न आदींचा उल्लेख करून ते सोडवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : द्रोणागिरीच्या रस्त्यांवर भर दिवसा पथदिवे सुरू, सिडकोच्या वीज विभागाचा सावळागोंधळ उजेडात

मराठा आरक्षण

लोकांना खरी भूमिका मांडलेली आवडत नाही , टाळ्या घेणाऱ्या घोषणा लोकांना आवडतात. मात्र वस्तूस्थितीला धरून निर्णय आवश्यक असतो. पूर्ण अभ्यास करून कायदा करणे आवश्यक असतो, अन्यथा न्यायालयात तो टिकणार नाही, असे भाष्य फडणवीस यांनी केले. यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पूर्वी माथाडी कामगारांना राजकिय वरदहस्त होता, असे सांगत माथाडी कायदा बदलण्याची गरज नसून त्याचा गैरवापर कसा रोखता येईल हे पाहणे योग्य राहील, असे मत मांडले. तसेच यासाठी प्रमुख माथाडी नेत्यांच्या समवेत एक बैठक घ्यावी. त्यात सविस्तर ऐकून घ्यावे, अशी मागणी केली. नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात माथाडी कामगार कायद्याविरोधात भूमिका घेणाऱ्या कामगार नेत्यांवर टीका करीत वेळप्रसंगी मोर्चे काढण्याचा इशारा दिला. 

हेही वाचा : चोरट्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे, संदीप नाईक, संजीव नाईक, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, मिलिंद भोंड, रविकांत पाटील, आनंद पाटील,  ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आदी मान्यवर उपस्थित आहेत.