नवी मुंबई: मोबाईल चोरटे एवढे सराईत झाले आहेत कि ” नजर हटी दुर्घटना घटी ” म्हणी प्रमाणे समोरच्याला काहीही कळण्याच्या आत मोबाईल हिसकावून किंवा ठेवलेला घेऊन चोरटे नजरेआड होतात. असाच प्रकार नवी मुंबईतील घणसोली भागात घडला आहे. नवरा बायको वडापाव खाताना त्यांनी आपल्या स्कुटीच्या सीटवर मोबाईल ठेवले असता सावजाच्या शोधात असणाऱ्या चोरट्याचे त्याच्या कडे लक्ष गेले आणि त्याने दुचाकीवर वेगात येत दोन्ही मोबाईल उचलून पसार झाला. त्यावेळी मोबाईल मालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.
आजकाल सहज मोबाईल वर बोलत चालत असताना, बस मध्ये चढताना उतरताना, वरच्या खिशातील वा पाठीवरील सॅकची चेन उघडून आतील मोबाईल घेत चोरटे पसार झाल्याच्या घटना ऐकण्यात येतात. सार्वजनिक ठिकाणी हे मोबाईल चोर बेसावध मोबाईल धारकाच्या शोधात भटकत असल्याचे लक्षात येत आहे. नवी मुंबईतील घणसोली भागात अशीच एक घटना समोर आली आहे. अर्जुनवाडी घणसोली येथे राहणारे माथाडी कामगार आशुतोष गाडे हे आपल्या पत्नी समवेत १२ तारखेला काही कामानिमित्त दत्तनगर भागात गेले होते.
आपले काम आटोपून ते निघत असताना त्यांना वडापाव खाण्याची इच्छा झाली. याच परिसरातील सदगुरु रुग्णालय समोरील पदपथावर वडापाव विक्री करणारा आहे. त्याच्या कडून त्यांनी दोन वडापाव घेतले. वडापाव खाताना हातात मोबाईल असल्याने व्यवस्थित वडापाव खाता येईना म्हणून त्यांनी दोघांनी त्यांच्या स्कुटीच्या सीटवर मोबाईल ठेवले. त्यांच्या आसपास मोबाईल चोरट्याने गाडीच्या सीटवर मोबाईल ठेवलेले पाहिले, तसेच नवरा बायको गप्पा मारत वडापाव खात असून बेसावध आहेत असे लक्षात आल्यावर चोरट्याने दुचाकीवर येत दोन्ही मोबाईल उचलून पळून गेला. धनाजी यांनी मोबाईल चोराला पकडले मात्र चोरट्याने त्यांना जोरदार धक्का देत स्वतःची सोडवणूक करीत पळून जाण्यात यशस्वी झाला. यात धनाजी खाली पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेत एक १५ आणि दुसरा १४ हजार रुपयांचा असा २९ हजार रुपयांचे दोन मोबाईल चोरी झाले आहेत. या प्रकरणी १६ तारखेला त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात येत अनोळखी चोरट्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस चोराचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.