पनवेल : मागील दोन दिवसांपासून दिवस रात्रीत कळंबोली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उभारलेले डीजीटल फलकावर वायु गुणवत्ता निर्देशांक ३३० वर असल्याचे दर्शवित होता. मात्र पनवेल पालिकेच्या आयुक्तांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तातडीने यावर स्पष्टीकरण मागीतल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणेने धाव घेत नेमके काय घडले याची चौकशी केल्यावर या फलकामध्ये बिघाड असल्याचे समोर आले आहे. पनवेल पालिकेच्या उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिलेल्या माहितीनूसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या ठेकेदार कंपनीला या फलकाची देखभाल व नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे त्या कंपनीच्या अभियंत्यांनी फलक व यंत्रातील तफावतीबद्दल कोणतीही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नव्हती.

त्यामुळे वायु गुणवत्ता निर्देशांकाची देखरेख करणाऱ्या इनोव्हा कंपनीच्या अभियंत्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांनी सूचना केल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह प्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली. हा फलक प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक कोटी रुपये खर्च करुन उभारला होता. पाच किलोमीटर अंतरापर्यंत होणाऱ्या हवेतील वायू गुणवत्ता निर्देशांकाचा अहवाल या यंत्रातून थेट सेक्टर २ येथील स्मृतिवन उद्यानात रस्त्याशेजारी लावलेल्या डीजीटल फलकावर दर्शविला जातो. मात्र दोन दिवसांपासून कळंबोलीतील हवेतील वातावरणात धूरके नसताना सुद्धा वायु गुणवत्ता निर्देशांक ३३० दर्शविला गेला होता.

हेही वाचा : अवेळी ऊन, वारा आणि पाणी; बदलत्या वातावरणाने मासळीची आणीबाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर पनवेल पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी याबद्दल थेट यंत्रठिकाणी नेमलेल्या अभियंत्यांकडे चौकशी केल्यावर तेथे अभियंते उपस्थित नव्हते. अखेर बेलापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात इनोव्हा कंपनीच्या व्यवस्थापकांची तातडीची बैठक बोलावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागीतल्यानंतर या फलकात बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. अखेर रात्री पुन्हा याच डीजीटल फलकावर हवेतील वायु गुणवत्ता निर्देशांक ११० ते २०० च्या आत असल्याचे दर्शविल्यानंतर सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.