नवी मुंबई – पनवेल तालुक्यातील नितळस गाव पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे एक वेगळेच उदाहरण घालून देत आहे. गेली तीन वर्षे येथे कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारल्या जात असून त्यातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जातो. यंदा या कारखान्यात ८ ते १० फूटी कागदी आकर्षक गणरायांच्या मूर्तींचे निर्माण मूर्तीकार पवार पितापुत्रांनी केले आहे. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता असणारे मोरेश्वर पवार गुरुजी हे सध्या पनवेल, नवी मुंबई येथील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांना पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचे निर्माते ठरले आहेत.

सेवानिवृत्तीनंतर पवार गुरुजी हे गेली १८ वर्षे कागदीमूर्ती घडवत आहेत. त्यांचा मुलगा प्रतिक पवार याच महाविदयालयातून शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण करून आता वडिलांच्या या परंपरेला आधुनिकतेची जोड देत आहे. पवार कुटुंबाची ही सातवी पिढी मूर्तीकलामध्ये कार्यरत आहे.एका कागदी गणपतींच्या निर्मितीस साधारण पंधरा दिवस लागतात. सध्या नितळस गावातील त्यांच्या कारखान्यातून तब्बल ८ ते १० फूट उंचीच्या चार भव्य मूर्ती तयार झाल्या आहेत. 

यंदा नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १६ अ येथील न्यु दौलत मित्र मंडळ, सीवूड येथील केंद्रीय विहार गणेश उत्सव मंडळ, सानपाडा येथील सोनखारचा राजा नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक मंडळ, आणि पनवेल शहरातील टपाल नाका येथील श्री गणेशमंडळ या सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्ती या कारखान्यातून बनवून घेतल्या. उंदीर आणि मोराचे वाहन असलेल्या अशा आकर्षक मूर्तींच्या निर्माणानंतर नितळस गावातील या कारखान्यात मूर्ती पाहणा-यांसाठी गर्दी झाली आहे. यापैकी काही मूर्ती रविवारी सार्वजनिक मंडळांचे प्रतिनिधी घेऊन गेले. कागदी लगद्यापासून बनलेल्या या मूर्तींची मागणी मागील दोन वर्षांपासून झपाट्याने वाढत असल्याचे शिल्पकार प्रतीक सांगतो.

बाजारात पीओपीच्या १० फूट उंच गणपतींची धामधूम असली तरी त्याच उंचीच्या, त्याच किमतीच्या आणि केवळ १५ किलो वजनाच्या या कागदी मूर्ती सहजपणे कृत्रिम तलावात विसर्जित करता येतात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टळतेच, शिवाय उत्सव शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडणेही सोपे जाते.या उपक्रमामुळे नितळस गावाशेजारील सात मजुरांना रोजगार मिळाला आहे. प्रतिक पवार सांगतात, की पीओपी मूर्तींची मोठी मागणी असली तरी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कागदी गणपती बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून जनजागृती होणे हाच आमचा उद्देश आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची ही चळवळ निसर्गस्नेही समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. नितळस गावातील शिल्पकार पवार पितापुत्र हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरतोय.

राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतरही पर्यावरणपूरक मूर्तीकारांसाठी ठोस पावले उचललेली नाहीत. पेण तालुक्यातील हमरापूर येथे जिल्हाधिकारी आणि लघु उद्योग केंद्र विभाग सामायिक सुविधा केंद्र उभारण्याचा आराखडा बनविणार आहे. या आराखड्यानूसार मूर्तीकारांना अत्याधुनिक साधने, प्रशिक्षण व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामायिक सुविधा केंद्र येथे उभारणार आहे. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प अद्याप अंमलात आलेला नाही.

केंद्र उभारणीची योजना कागदावरच अडकून पडली आहे. परिणामी मूर्तीकारांना स्वतःच्या खर्चावरच कच्चा माल, यंत्रसामग्री व मनुष्यबळ उभारावे लागत आहे. शाडू माती पनवेल महापालिकेने उपलब्ध केली असली तरी मूर्तीकार आणि रंगकामाचे मजूरांचे कौशल्यशुल्कावर जास्तीची रक्कम खर्च होत असल्याने मूर्तींच्या किमती कमी झाल्या नाहीत. यामुळे स्थानिक मूर्तीकारांचा प्रश्न कायम आहे सरकारने पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याच्या व्यवसाय करणा-यांसाठी अधिक सोयी देणे गरजेचे आहे.