पनवेल – पनवेल येथील एका मुलींच्या बालगृहातून पाच मुलींनी पलायन केले होते. या मुलींचे वय १२ ते १७ वर्षे असल्याने याबाबत पनवेल शहर पोलीस मुलींना फूस लावून पळून नेल्याचा अपहरणाचा गुन्हा रविवारी दुपारी नोंदविण्यात आला. काही तासांमध्ये या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे पोलीस आणि अपहरण झालेल्या मुलींच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीमुळे तपास यंत्रणांना त्यापैकी तीन जणी सूखरूप असल्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. बालगृहात रहायचे नाही म्हणून या मुली पळून गेल्याचे सापडलेल्यांपैकी काही मुलींनी सांगितले.

पनवेल येथील बालगृहातून रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सूमारास मुलींच्या बालगृहातून मुली बेपत्ता झाल्याची तक्रार बालगृह व्यवस्थापनाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सुट्टीच्या दिवशी सर्वच पोलिसांची धावपळ सुरू झाली. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच मुलींच्या शोधार्थ पहिला गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूनील वाघ आणि त्यांचे पथक मुली कुठे जाऊ शकतात त्यांचे मूळ गाव कोणते याची माहिती बालगृहाच्या केअरटेकर महिलेकडून घेण्यात आली. केअरटेकर महिलेने बालगृहातील मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून त्यांचे अपहरण केल्याची तक्रार म्हटल्याने या प्रकरणाला अजून गांर्भिय आले.

अपहरण झालेल्या मुलींमध्ये १२, १४ आणि १७ वर्षांची प्रत्येकी एक आणि १६ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश असल्याने बालगृहातील अंतर्गत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला. दुपारनंतर या बालगृहात बालक कल्याणकारी समितीच्या सदस्यांनी भेट देऊन तेथील अन्य मुलींकडे प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत बालगृहातील मुलींनी बालगृह व्यवस्थापनाबद्दल तक्रार केली नाही. या दरम्यान पोलिसांनी त्यांचे लक्ष्य बेपत्ता मुलींच्या तपासकार्याकडे केंद्रीत केले होते. पनवेल शहर पोलिसांनी तोपर्यंत मुंबई व उपनगरातील इतर रेल्वे पोलिसांकडे समन्वय साधून मुलींची माहिती कळवली होती. तसेच मुलींच्या दूरच्या नातेवाईकांनी याबाबत पोलीस संपर्कात होते.

या बालगृहाच्या संकेतस्थळावर दर्शविल्याप्रमाणे मे २०२० मध्ये या बालगृहाची स्थापना झाली असून मुलींच्या पूनर्वसनासाठी आश्रयगृहाचे काम या बालगृहात केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या या बालगृहात ३९ मुली आहेत. या पाच मुलींना शिक्षा म्हणून नव्हेतर पुनर्वसनाच्या हेतूने या बालगृहात ठेवण्यात आले होते. यातील एक मुलगी उरण येथील एका प्रकरणातील पिडीत आहे. तर इतर चार मुली या तळोजा, पनवेल व कर्जत येथील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यांचे पालक नसल्याने त्यांना या बालगृहात ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी इतर तपास यंत्रणांकडे केलेल्या समन्वयामुळे या शोधमोहीमेला यश आले. पाच पैकी तीन मुली सापडल्या. यातील एक मुलगी उरण येथील चिरनेर येथे तीच्या गावी सापडली. दूसरी मुलगी मुंबई येथील बांद्रा येथे रेल्वे पोलिसांना सापडली. तीच्यासोबत कोण नसल्याने या मुलीला डोंगरी येथील बालगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच तीसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तीच्या मूळ गावी गेल्याचे पोलिसांना समजले. या मुलीला सुद्धा नजीकच्या बालगृहात ठेवण्याची कार्यवाही सातारा पोलिसांकडून सुरू असल्याचे पनवेल शहर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील इतर दोन मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.

बालगृहात रहायचे नाही म्हणून त्या पळाल्या…

पनवेल येथील मुलींचे बालगृहाची इमारत एक मजली आहे. मुलींना या बालगृहात मनाप्रमाणे राहायला मिळत नसल्याने त्यांनी पळून जाण्याचे नियोजन केले. बालगृहातील सभागृहातील खिडकीची लोखंडी ग्रील कापली. त्यानंतर खिडकीच्या बाहेर पाण्याची टाकीवर त्या उतरल्या. काही अंतर चालल्यावर शौचालयाच्या पाईपवरून घसरून त्या एक मजल्यावरून खाली उतरल्या.