उरण : नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोड परिसराला तसेच येथील खारकोपर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या जासई नाका ते गव्हाण मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी येथील प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी काही प्रमाणात काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. मात्र या मार्गावरील अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खड्ड्यांचे प्रमाणही वाढले आहे.

जासई-गव्हाण रस्ता सार्वजनिक बांधकाम (अलिबाग) व सिडको यांच्या कात्रीत सापडला आहे. या रस्त्याबद्दल अनेक तक्रारी करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळत नाही. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता दाट आहे. येथील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने स्थानिक प्रवासी, रिक्षाचालक, चारचाकी वाहनधारक व दुचाकी चालवणाऱ्यांना अपघातांना तोंड द्यावे लागते. खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (अलिबाग)च्या अधिकाऱ्यांशी या रस्त्याच्या कामाविषयी विचारणा केली असता, निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात आले.
सिडकोकडून कामाला सुरुवात

या विभागात सिडको ने भूसंपादन केलेले आहे. सिडकोचे अनेक प्रकल्प या विभागात चालू आहेत. यामध्ये प्रामुख्याने न्हावा-शिवडी सी लिंक, मास हाऊसिंग प्रकल्प, विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे मार्ग असे अनेक प्रकल्प या ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. हा रस्ता लवकरात लवकर सिडकोकडे हस्तांतरित करावा अशी मागणी केली आहे. यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सिडकोकडे मागणी केली होती. त्यानुसार या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.

हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे त्यातील २ हजार ४०० मीटरच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून ६०० मीटरचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल. – नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग