नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असल्याने उन्हाचा पारा वाढत आहे. हवामान विभागाकडून काही दिवस उच्च तापमान आणि उष्ण हेवेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हाने नागरिकांच्या जिवाची काहिली होत असून शीतपेय, लिंबू सरबत यांना मागणी वाढत आहे. परंतु बाजारात लिंबाची आवक कमी होत असून मागणी वाढल्याने दरात प्रति किलो १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.

उन्हाळा सुरू होताच शीतपेय, फळांचा रस, सरबत आणि लिंबू पाणीची मागणी वाढते. लिंबू गुणकारी असल्याने खाण्यात लिंबाचा वापर हा १२ ही महिने सुरू असतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबूला विशेष मागणी असते. रसवंतीगृहे, ज्यूस सेंटर इत्यादी ठिकाणी लिंबू जास्त वापरला जातो. आता उन्हाचा पारा वाढत असून ३५ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार पाणी पिण्याचाही सल्ला देण्यात येत आहे. शरीरात पाण्याची क्षमता टिकून राहावी याकरिता पाण्याबरोबर लिंबू पाण्यालाही पसंती दिली जात आहे. एकीकडे लिंबाची मागणी वाढली असताना आवक मात्र कमी होत आहे. ३० ते ४० टक्क्यांनी आवक घटली असून ती आधी एपीएमसीसह मुंबई उपनगरातील बाजारात १२० टन होती, परंतु यामध्ये घट झाली असून ७० ते ८० टन लिंबू दाखल होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची वाढ झाली असून आधी ६० रुपये किलो दराने विक्री होणारे लिंबू आता ७० ते ७५ रुपयांनी विक्री होत आहे, अशी माहिती व्यापारी चंद्रकांत महामुलकर यांनी दिली.

हेही वाचा – सिडकोच्या शौचालयाचा केला ‘सैराट बार’, मनसेने शौचालयात धडक देत सर्विस बारचा केला भांडाफोड

हेही वाचा – नवी मुंबई : माथाडी नेते शासनाच्या बैठकीच्या प्रतीक्षेत

हिरवी मिरची वधारली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एपीएमसी बाजारात हिरवी मिरचीची आवक कमी होत असल्याने हिरव्या मिरचीने घाऊकमध्ये चाळीशी पार केली आहे. एपीएमसी बाजारात सुरुवातीला दर आटोक्यात होते. मात्र आता दरात वाढ होत आहे. या आधी घाऊक बाजारात प्रतिकिलो ३० रुपयांवर उपलब्ध असलेली मिरची आता ४०-४६ रुपयांवर पोहोचली आहे. १० ते १५ रुपयांनी भाव वधारले आहेत. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून हिरवी मिरची दाखल होत असते. सध्या बाजारात २०३९ क्विंटल मिरची दाखल होत आहे. मात्र मागणीनुसार पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. तर दुसरीकडे सर्व भाजीपाल्यात भाव खाणारी भेंडी आता स्वस्त झाली आहे. त्याचबरोबर वांगी आणि शिमला मिरचीचे दरही कमी झाले आहेत. बाजारात भेंडीची १२०१ क्विंटल आवक असून प्रतिकिलो ४० रुपयांवरून आता ३४ रुपयांनी उपलब्ध आहे. वांगी २३४ क्विंटल आवक असून २४-३६ रुपयांनी विक्री होती त्यात घसरण झाली असून १६-१८ रुपये आहे. १३३२ क्विंटल शिमला मिरची दाखल झाली असून १६-२४ रुपये दराने विक्री होत आहे.