नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत भारतीय महिला संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणारी जेमिमा रॉड्रिग्ज आता लवकरच नवी मुंबईची रहिवासी होणार आहे. आपल्या उत्साही फलंदाजीसाठी आणि खेळातील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखली जाणारी जेमिमा गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईतील विविध मैदानांवर नियमित सराव करत असून, आता तिने येथे कायमचे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.

जेमिमा सध्या मुंबईतील बांद्रा परिसरात राहत असली, तरी रोजच्या सरावासाठी तिला नवी मुंबईत ये-जा करावी लागत होती. या प्रवासात तिचा बराच वेळ वाया जात असल्याने तिने तिच्या कुटुंबासाहित आता नवी मुंबईतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.जेमिमाचे प्रशिक्षक विकास साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी सेक्टर-१४ मधील रजनीश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तिने दोन वर्षांपूर्वी एक घर खरेदी केले होते. आता विश्वचषक जिंकल्यानंतर जेमिमा व तिचे कुटुंबीय लवकरच या घरात स्थलांतरीत होणार असल्याची माहिती साटम यांनी दिली.

नवी मुंबईत अत्याधुनिक क्रीडा सुविधा आणि सरावासाठी उपलब्ध असलेले दर्जेदार स्टेडियम्स हेच तिच्या निर्णयामागचे मुख्य कारण असल्याचे जेमिमाने सांगितल्याचे साटम यांनी म्हटले आहे. नवी मुंबईतील मैदानांची गुणवत्ता, खेळासाठी मिळणाऱ्या सुविधा आणि शांत वातावरण हे खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळेच जेमीमाने हा निर्णय घेतल्याचे तिचे प्रशिक्षक विकास साटम यांनी सांगितले. त्याशिवाय तिच्या आई-वडिलांचीही नवी मुंबईत राहण्याची इच्छा असल्याने जेमिमाला हा निर्णय घेणे सोपे गेल्याचे साटम यांनी सांगितले.वाशीतील डी.वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ आणि ऐरोलीतील क्रीडांगणे, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर येथील राजीव क्रीडा संकुलांमुळे हा परिसर आता अनेक राष्ट्रीय खेळाडूंसाठी पसंतीचे ठिकाण बनत आहे. जेमिमाच्या वास्तव्यामुळे नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्राला एक वेगळी ओळख मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

जेमिमा रॉड्रिग्जने अलीकडील महिला विश्वचषक स्पर्धेत चमकदार फलंदाजी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तिच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक झाले. योगायोग म्हणजे हा सामना नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानावर खेळण्यात आला होता. त्यानंतर झालेला अंतिम सामानाही नवी मुंबईतच झाला. ज्यात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी बजावत पहिल्यांदा विश्वविजेता बनण्याचा मान मिळवला. त्यामुळे नवी मुंबईला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज नवी मुंबईत कायमस्वरूपी राहायला येत असल्याने शहरातील तरुण क्रिकेटपटूंना आणि विशेषतः महिला खेळाडूंना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

“जेमिमाने नवी मुंबईत घर खरेदी केले आहे. परंतु, तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिला नवी मुंबईत स्थलांतरित होण्यासाठी वेळ मिळाला नाही. गेल्या दोन वर्षांपासून ती नवी मुंबईत प्रशिक्षणासाठीही येत आहे. त्यामुळे अद्याप तारीख ठरली नसली तरी लवकरच जेमिमा आपल्या आई-वडिलांसोबत नवी मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक होईल अशी शक्यता आहे.”

विकास साटम, जेमिमाचे प्रशिक्षक

“जेमिमा ही अनेक वर्षांपासून नवी मुंबईसोबत जोडली गेली आहे. नवी मुंबईतील महिला खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी तिने महिला खेळाडूंसाठी आयोजित अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे. तिने दोन वर्षांपूर्वी नवी मुंबईत घर घेतले असले तरी आमच्यासाठी ती ‘नवी मुंबईकर’च आहे. त्यामुळे तिचे नवी मुंबईत स्थायिक होणे हे नवी मुंबईतील केवळ क्रिकेटच नव्हे तर इतर खेळातील खेळाडू आणि विशेषतः महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तिने नवी मुंबई शहराला राहण्यासाठी निवडले याचा एक नवी मुंबईकर म्हणून आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.” संदीप नाईक, माजी आमदार व क्रीडाप्रेमी, नवी मुंबई