‘आयटीएस’ यंत्रणा महिनाभरात कार्यान्वित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) ६३ मार्गावर दररोज धावणाऱ्या बस गाडय़ांची इत्थंभूत माहिती आता बेलापूर येथील एनएमएमटीच्या मुख्यालयात मिळणार आहे. पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी मंगळवारी या यंत्रणेची पाहणी करून काही सूचना दिल्या. बस गाडय़ांची वेगमर्यादा, बस थांबे, बस थांब्यावर न थांबणाऱ्या बस गाडय़ा, बंद पडणाऱ्या गाडय़ा, बसने किती किलोमीटर अंतर पार केले, याची माहिती या इंटेलिजेन्टस ट्रान्स्पोर्ट सिस्टममुळे (आयटीएस) प्राप्त होणार आहे. येत्या महिन्याभरात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

नवी मुंबईतील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने २३ जानेवारी १९९६ रोजी केवळ २५ बस गाडय़ांसह परिवहन सेवा सुरू केली. त्यापूर्वी नवी मुंबईसाठी असलेली सिडकोची बीएमटीसी बस सेवा बंद पडल्याने बेस्ट आणि एसटी सेवा येथील प्रवाशांची गरज भागवत होती. एसटीने ही सेवा बंद केली आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात आता ४५० बसगाडय़ा असून ३९८ गाडय़ा ६३ मार्गावर धावतात. यात मुंबईसह एमएमआरडी क्षेत्रात एनएमएमटीच्या बसगाडय़ा आहेत. त्यांच्यावर जीपीआरएस प्रणाली बसविली आहे. त्यामुळे गाडय़ांच्या हालचालीवर बस आगारातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. याशिवाय बस किती वेळाने पोहचली. बस चालकांनी एखादा बस थांबा चुकवला आहे का, गाडीचा वेग किती आहे, ती कुठे आहे हे देखील समजणार आहे.

बसच्या आगमनाची माहिती मिळणार

काही माहिन्यांपूर्वी एनएमएमटीने आपले अ‍ॅप तयार केले आहे. याशिवाय उपक्रमाने ७५ ठिकाणच्या बस थांब्यांवर स्क्रीन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानकांवर बस किती वाजता येईल आणि किती वाजता तेथून निघेल याची माहिती मिळणार आहे. वाशी येथील बस स्थानकात हे स्क्रीन लावण्याचे काम सुरू झाले आहे. पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी मंगळवारी एनएमएमटीच्या मुख्यालयात (जुने पालिका मुख्यालय) जाऊन या प्रणालीची माहिती घेतली. त्यात असणाऱ्या काही त्रुटीदेखील दूर करण्यास आयुक्तांनी सांगितले. याशिवाय डिझेल भरणा करताना किंवा वाहनातील डिझेलचीही माहिती उपलब्ध केली जाणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intelligent transport system nmmt bus information
First published on: 12-05-2017 at 01:15 IST