नवी मुंबई : द वॉशिंग्टन पोस्ट या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रातील स्तंभलेखिका आणि प्रख्यात शोध पत्रकार राणा अय्यूब यांना अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सॲपवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.प्राप्त माहितीनुसार, राणा अय्यूब या कोपरखैरणे सेक्टर १४ येथे राहतात.
राणा अय्युब यांनी ४ नोव्हेंबर रोजी आपल्या एक्स पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून वारंवार व्हॉट्सॲप कॉल आले. त्यांनी हे कॉल न उचलल्याने संबंधित व्यक्तीने त्यानंतर व्हॉट्सॲपवरून राणा अय्युब यांना धमकीचा संदेश पाठविला. या संदेशात, “तुम्ही द वॉशिंग्टन पोस्ट मध्ये १९८४ च्या शीख हत्याकांड आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खुनांबाबत गौरव करणारे लेख लिहा, अन्यथा तुमच्या घरी शूटर्स पाठवून न्यू इयर साजरा करू,” असा इशारा देण्यात आला होता. त्या पोस्ट मध्ये लिहील्यानुसार, त्या व्हॉट्सॲपवरील डीपी हा लॉरेन्स बिश्नोई याचा असल्याचे त्यांनी सांगितले.
संदेशात केवळ धमकीच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक पत्त्याचा आणि कुटुंबासंबंधी माहितीचा उल्लेख करून भय निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. “तुझा पत्ता आणि सर्व माहिती आमच्याकडे आहे. तू आणि तुझे वडील अजनगढ येथे आहात, तुम्हाला मारण्यात येईल. योगी आणि त्यांची पोलीसदेखील काही करू शकणार नाहीत,” असेही त्या धमकीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(४) अंतर्गत गंभीर धमकीचा गुन्हा नोंदविला असून, तपास सायबर शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी त्या आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा स्रोत, IP अॅड्रेस आणि लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
राणा अय्यूब या Gujarat Files: Anatomy of a Cover-Up या चर्चित तपास पुस्तकाच्या लेखिका असून, केंद्र आणि राज्य सरकारवरील भ्रष्टाचार, अन्याय आणि दहशतवादाशी संबंधित विषयांवर त्यांनी सातत्याने निर्भीड भूमिका घेतली आहे. यापूर्वीही त्यांना सोशल मीडियावरून धमक्या मिळाल्या होत्या; मात्र यावेळी थेट जीवघेणी धमकी दिल्याने पत्रकारिता क्षेत्रात आणि सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.पत्रकार राणा अय्यूब यांच्या सुरक्षेबाबत काही माध्यमसंस्था आणि मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली असून, केंद्र सरकारकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
