पनवेल : मुंब्रा पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता वाहतूक पोलीस कर्मचा-यांना एका हलक्या मोटारीचा संशय आल्याने त्याने वाहनाची चौकशी केल्यावर त्यामध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समजले. मोटारीमध्ये भरलेल्या गोणींसह मोटार कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आली. सध्या सुगंधी सूपारी आणि तंबाखूच्या पुढ्यांनी भरलेली ही मोटार पोलीस ठाण्यात जप्त केली आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमूळे या गुटखा वाहतूकीला वाचा फुटली.

मंब्रा शिळफाटा येथील कुरपाडा येथील उर्वशी सोसायटीत राहणारा ३१ वर्षीय चालक हा होंडासिटी या मोटारीने गोण्या भरून मुंब्रा ते पनवेल या मार्गावरून भरधाव वेगाने मोटार चालवित होता. याच दरम्यान जेवणाचा डब्बा खाण्यासाठी खांदेश्वर येथून निघाले कळंबोली वाहतूक पोलीस विभागाचे हवालदार उमेश कराळे आणि पोलीस शिपाई ज्ञानेश्वर राठोड हे कळंबोली सर्कल येथील वडाच्या झाडाखालील कॅन्टीनमध्ये जात असताना त्यांना भरधाव वेगाने जाणारी मोटार दिसली. या मोटारीचा पाठलाग करून या दोन पोलीस कर्मचा-यांनी ही मोटार थांबवली. संशयीत मोटार चालकाला मोटारीत काय असा प्रश्न विचारल्यावर त्याने घरातील सामान नेत असल्याचे सांगितले.

मात्र तरीही हवालदार कराळे यांनी सामान खोलून दाखव असे सांगीतल्यामुळे चालकाची पंचाईत झाली. पोलिसांनी मोटारीतील गोणी खोलून पाहील्यावर त्यांना तीन गोण्यांमध्ये सहा प्लास्टीक मोठ्या प्रत्येक पिशव्यांमध्ये ३५ वाराणसी आशिकी सुपा-यांच्या ५० ग्रॅम वजनाच्या लहान पिशव्या सापडल्या. तसेच १८ प्लास्टीकच्या वेगळ्या मोठ्या पिशव्या या प्रत्येक पिशव्यांमध्ये ३५ तंबाखु मिश्रणाच्या लहान पिशव्या आढळल्या. ६३ हजार रुपयांचा या मालासह अडीच लाख रुपयांची मोटार घेऊन वाहतूक कर्मचारी हे कळंबोली पोलीस ठाण्यात गेले. 

कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी याबाबत उपायुक्त प्रशांत मोहीते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्याकडून घेतलेल्या मार्गदर्शानंतर हा सुगंधी पानमसाला प्रतिबंधित गुटख्यांसाठीच वापरला जात असल्याने गुन्हा दाखल करण्याचे ठरले. 

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अयाज पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगले हे करीत आहेत.  गुटख्यासाठी वापरणा-या सुगंधी सुपारी पिशव्या घेऊन जाणारा मोटार चालकाकडे चौकशी केल्यावर मुंब्रा आणि पनवेल येथील दोन व्यापा-यांची नावे समोर आली आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यात या व्यापा-यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.  या घटनेनंतर कळंबोली वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी उमेश कराळे आणि ज्ञानेश्वर राठोड यांनी सर्तकपणे केलेल्या कामगिरीविषयी कळंबोली वाहतूक विभागाच्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी समाधान व्यक्त केले आहे.