शहरबात : विकास महाडिक
सिडकोने वन विभागाच्या खारफुटी विभागाला मागील आठवडय़ात २८१ हेक्टर कांदळवन क्षेत्र हस्तांतरित केले. ही एक शासकीय हस्तांतरित प्रक्रिया असली तरी महामुंबईच्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वाची आणि दूरदर्शी आहे. नवी मुंबईतील ३१ किलोमीटर व पनवेल, उरणमध्ये २९ किलोमीटर असा सुमारे ६० किलोमीटर लांबीचा खाडी किनारा लाभलेल्या महामुंबई क्षेत्रात कांदळवन टिकवणे त्याचे संवर्धन करणे ही सर्वाची जबाबदारी आहे.
कोकणात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण व महाड ही शहरे पुरात वाहून गेली. खाडीला पर्यायी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचे पाणी गेल्या मार्गाने माघारी फिरल्याने नदी किनारी असलेली ही दोन शहरे बुडाली. यात मोठय़ा प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी झाली आहे. ही वेळ खाडी किनारी असलेल्या कोकणातील हजारो गावे व मुंबई महानगर प्रदेशातील शहरांवर केव्हाही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी केवळ खारफुटी या गावांना व शहरांना वाचवू शकते हे यापूर्वी सिद्ध झाले आहे.
पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओरिसा या राज्यांना यापूर्वी बसलेल्या वादळाच्या तडाक्यातून खारफुटीने वाचविलेले आहे. ज्या ठिकाणी खारफुटीचे जंगल म्हणजे कांदळवन आहे. त्या गावांना व शहरांना समुद्राच्या लाटांची कमी धोका असल्याचे दिसून आले आहे. समुद्र, खाडी आणि लोकवस्ती यामध्ये ही कांदळवने तटरक्षकाचे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने त्यांच्या अधिकार क्षेत्रात असलेले असे २८१ हेक्टर क्षेत्र संरक्षण आणि संवर्धनासाठी वन विभागाकडे हस्तांतरित केले आहे. ही एक चांगली बाब आहे. नवी मुंबई शहर प्रकल्प उभा करताना राज्य शासनाने बेलापूर, पनवेल, उरण येथील ९५ गावातील सर्व खासगी व शासकीय जमीन सिडकोकडे हस्तांतरित केली. यात खारफुटी जमिनीचाही समावेश होता. या जमिनीवर मोठय़ा प्रमाणात मिठागरे होती. खाऱ्या जमिनीत जिची फूट होते ती खारफुटी असे एक साधे सरळ समीकरण या वनस्पतीबद्दल आहे. ५० वर्षांपूर्वी या खारफुटीचे महत्त्व अधोरिखित झालेले नव्हते. त्यामुळे ती तोडण्यात धन्यता मानली जात होती. महामुंबई क्षेत्रात अनेक व्यापाऱ्यांची दीर्घ भाडेपट्टय़ावर असलेली मिठागरे होती. ती बुजवून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली असून यात १६ हजार हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. त्यामुळे महामुंबई
क्षेत्रात कुठेही कधीही खारफुटीचे एखादे
रोप दिसून येते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत ही खारफुटी सहज कापून, जेसीबी लावून उखडून फेकली जात होती. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात अनेक प्रकल्प हे या खारफुटीच्या मूळावर उभे आहेत. या प्रकल्पांच्या आजूबाजूला असलेली ही खारफुटी अधूनमधून डोके वर काढते. त्यामुळे अनेक प्रकल्प अडचणीत आलेले आहेत.
अनेक जातीच्या वनस्पतींचा समूह म्हणजे खारफुटीचे जंगल ठाणे खाडी किनारी मोठय़ा प्रमाणात आहे. वन विभागाच्या एका सर्वेक्षणानुसार हे ३०४ चौरस किलोमीटर आहे. सिडकोने वसवलेली नवी मुंबई ३४४ चौरस किलोमीटरवर आहे. सिडकोच्या नवी मुंबई एवढे हे कांदळवन क्षेत्र आहे. त्यात सिडकोने दिलेल्या या २८१ हेक्टर कांदळवनाची भर पडलेली आहे. दलदल, चिखलातच वाढणाऱ्या या वनस्पतीची कोणत्याही प्रकारची लागवड करावी लागत नसल्याने तिला आतापर्यंत फार महत्त्व दिले गेले नाही. पण राज्यातील अनेक खाडी किनाऱ्यांना वादळाचे जे तडाखे बसले आणि देशात त्सुनामीसारख्या लाटा आल्यानंतर या इवलाश्या खारफुटीचे महत्त्व अन्यन्यसाधारण असल्याचे सर्वानीच मान्य केले आहे. भरती आणि ओहोटीच्या दरम्यान असलेल्या पातळीत ही वनश्री निर्माण होत असल्याने नवी मुंबईत सिडकोने ४० वषार्र्पूर्वी समुद्राच्या या पाण्याचे नेदरलॅण्ड देशाच्या धर्तीवर उघाडी पद्धतीचे अवलंब करून चांगले नियोजन केले आहे. त्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. प्रत्येक शहरांच्या बाहेर हे पाणी थोपविण्यासाठी एक धारण तलाव बांधण्यात आलेला आहे. या धारण तलावांमध्ये आता मोठय़ा प्रमाणात खारफुटीचे कांदळवन तयार झाले आहे. मुंबई उच्च न्यायालय, राज्य सरकार यांनी खारफुटीला संरक्षण देण्याचे धोरण राबविलेले आहे. त्यामुळे हे धारण तलाव स्वच्छ करता येत नाहीत. त्यात गाळ आहे आणि त्यावर रुजलेल्या खारफुटी वनस्पती आहेत. सरकारच्या धोरणानुसार या खारफुटीला हात लावणे गुन्हा आहे पण या धारण तलावांची स्वच्छता होणे देखील तेवढचे महत्त्वाचे आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या आडदेखील ३०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खारफुटीचा अडथळा येत होता. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सिडकोला पर्यायी खारफुटी क्षेत्र निर्माण करण्यास सांगितले आहे. विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याला येणारे अडथळे दूर करणे आवश्यक आहे पण शहराच्या नियोजनाचा एक भाग म्हणून बांधण्यात आलेले धारण तलाव स्वच्छ करण्याची तेवढीच आवश्यकता आहे. अन्यथा भरतीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खारफुटीची इतरत्र सहज लागवड करता येते. हा या खारफुटी संवर्धनाचा एक भाग आहे. नवी मुंबई विमानतळ उभारण्यासाठी कोटय़वधी टन मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्याखाली किती खारफुटी दबल्या गेल्या आहेत. त्याची मोजदाद नाही. उरणमध्ये जेएनपीटी बंदराच्या विकासातही खारफुटीची जंगले उद्ध्वस्त झालेली आहेत. महामुंबईची निर्मितीच मुळात या खारफुटीला गाडून करण्यात आलेली आहे.